रसाळ, मधूर आंबा कोणाला आवडत नाही. अनेकांना उन्हाळा ऋतू आवडण्यामागचं कारण त्या मोसमात येणारे आंबे. महागाई कितीही वाढली तरीही अनेकजण आंबा खातात. कारण हौसेला मोल नसतं. मार्च महिना संपत आला असताना बाजारात फळांचा राजा दिसू लागला आहे. देशात विविध प्रकारच्या आंब्यांचं उत्पादन घेतलं जातं. त्यांच्या किमतींमध्येही मोठी तफावत असते.
मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये पिकणारा 'ताईयो नो तामागो' आंबा आंतरराष्ट्रीय बाजारात भाव खातो. एका आंब्याला तब्बल २ लाख ७० हजार रुपयांचा भाव मिळतो. मुख्यत: हा आंबा जपानमध्ये पिकतो. मात्र आता जबलपूरमध्येही त्याची शेती होऊ लागली आहे. लाखमोलाचा असल्यानं आंब्याच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते.
जबलपूरचे संकल्प परिहार 'ताईयो नो तामागो' आंब्याचं उत्पादन घेतात. या आंब्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी बागेत ३ सुरक्षा रक्षक आणि ९ श्वान तैनात ठेवले आहेत. या आंब्याला एग ऑफ सन म्हणजेच सूर्याचं अंडदेखील म्हटलं जातं. काही दिवसांपूर्वी बागेत चोरी झाली होती. तेव्हापासून बागेत सुरक्षा रक्षक तैनान करण्यात आले.
पूर्णपणे पिकल्यावर 'ताईयो नो तामागो' आंब्याचं वजन ९०० ग्रॅमच्या आसपास जातं. त्याचा रंग फिकट पिवळा आणि लाल होतो. हा आंबा अतिशय गोड लागतो. जपानमध्ये पॉलीहाऊसमध्ये या आंब्याचं उत्पादन घेतलं जातं. मात्र संकल्प परिहार यांनी उजाड जमिनीवर या आंब्याची शेती केली आहे. चार एकरवर त्यांनी आंब्यांची लागवड केली आहे. १४ विविध प्रकारच्या आंब्यांचं उत्पादन ते घेतात. 'ताईयो नो तामागो'ची ५२ झाडं त्यांनी लावली आहेत.