नवी दिल्ली: दिल्लीतील प्राणिसंग्रहालयात घडलेल्या घटनेमुळे अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. एका 21 वर्षीय तरुणानं सिंहाच्या पिंजऱ्यात प्रवेश केल्यानं काही वेळ बराच गोंधळ झाला. हा तरुण थेट सिंहाजवळ जाऊन बसला. यानंतर उपस्थितांनी मदतीसाठी आरडाओरड केली. या घटनेची माहिती मिळताच प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनी तरुणाला पिंजऱ्यातून बाहेर काढलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये तरुण एका झाडाजवळ बसलेला दिसत आहे. त्याच्या जवळ एक सिंह आहे. सिंह जवळपास मिनिटभर शांत राहिल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. यानंतर सिंहानं तरुणाच्या दिशेनं झेप घेण्याचा प्रयत्न केला. प्राणिसंग्रहालयाच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून तरुणाची सुटका केली. 'सिंहानं तरुणाला इजा करण्यापूर्वीच त्याची सुटका करण्यात आम्हाला यश आलं. हा तरुण ईशान्य दिल्लीचा रहिवासी असून तो मनोरुग्ण आहे. आम्ही त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे,' अशी माहिती पोलीस उपायुक्त (आग्नेय) चिन्मय बिस्वल यांनी दिली.
VIDEO: पिंजऱ्यात जाऊन 'तो' थेट सिंहासमोर बसला अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2019 4:36 PM