नवी दिल्ली : ‘मन की बात’या कार्यक्रमावर टीका करणा-यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी प्रत्युत्तर दिले. हा कार्यक्रम म्हणजे जनतेच्या भावना, इच्छा, तक्रारी मांडण्याचे व्यासपीठ आहे. यातून प्रेरणा तर मिळते. सुधारणांसाठीही उपयोग होतो, असे सांगत या कार्यक्रमातून राजकारण कटाक्षाने दूर ठेवल्याचे मत मोदी यांनी व्यक्त केले.‘मन की बात’ला तीन वर्ष पूर्र्ण झाले. या कार्यक्रमाबद्दल ते म्हणाले की, ‘मन की बात’ही सकारात्मक शक्ती आहे. देशाच्या कानाकोपºयातून अनेक लोकांच्या यावर प्रतिक्रिया येतात. आपल्या अर्ध्या तासाच्या भाषणात त्यांनी अनेक विषयांना स्पर्श केला. स्वच्छता अभियान, विविधतेतून एकतेचे महत्व आदी विषयावर त्यांनी मत व्यक्त केले. शहीद सैनिकाच्या पत्नी लेफ्टनंट स्वाती आणि निधी सैन्यात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. दरम्यान, काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी मोदी यांच्या ‘मन की बात’या कार्यक्रमावर टीका केलेली आहे.महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बोलताना मोदी म्हणाले की, खादी एक वस्त्र नाही तर एक विचार आहे. खादीमुळे गरीबांच्या घरात थेट रोजगार पोहोचत आहे. तरुण पिढीत खादीचे आकर्षण वाढत आहे. खादीची विक्री वाढत आहे. खादीचे वस्त्र खरेदी करून, गरिबांच्या घरात दिवाळीचा दिवा पेटवा, असे आवाहन त्यांनी केले.
‘मन की बात’जनतेच्या अभिव्यक्तीचे व्यासपीठ - पंतप्रधान मोदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 2:15 AM