नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवार) त्यांच्या नियोजित 'मन की बात' कार्यक्रमाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बिहार आणि आसाममध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीपासून ते कोरोना महामारीच्या संकटापर्यंत अनेक विषयांवर भाष्य केले. सर्वात महत्वाचे म्हणजे, "लक्षात असू द्या, की कोरोना अजूनही तेवढाच घातक आहे, जेवढा तो सुरुवातीला होता. यामुळे आपल्याला पूर्णपणे सावध राहायचे आहे, असे मोदी म्हणाले.
मोदी म्हणाले, मी आपल्याला आग्रह करेन, की मास्कमुळे त्रास होत असेल आणि मनात आले, की मास्क काढून टाकावा, तेव्हा क्षणभरासाठी त्या डॉक्टरांचे, त्या नर्सेसचे आणि आपल्या कोरोना वॉरियर्सचे स्मरण करा. जे मास्क परिधान करूनच तासंतास, सातत्याने, आपल्या सर्वांचे जीवन वाचवण्यासाठी संघर्ष करत आहेत.
यावेळी पंतप्रधान मोदींनी, स्वातंत्र दिनानिमित्त जनतेला कोरोना महामारीपासून मुक्त होण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले. तसेच कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. यामुळे मास्कचा वापर नक्की करा, असे मोदी म्हणाले. तसेच त्यांनी मिथिला पेंटिंग बरोबरच आसाममध्ये बांबूच्या वस्थू तयार करून आत्मनिर्भर होत असलेल्या नागरिकांची गोष्टही देशाला सांगितली.
आज आपला देश ज्या उंचीवर उभा आहे, त्या पाठीशी अनेक महान विभूतींची तपश्चर्या आहे. ज्यांनी राष्ट्र निर्माणासाठी आपले जीवन समर्पित केले. अशाच महान विभूतींपैकी एक लोकमान्य टिळक. 1 ऑगस्ट 2020 रोजी लोकमान्य टिळकांची 100वी पुण्यतिथी आहे. लोकमान्य टिळकांचे जीवन आपल्या सर्वांसाठी मोठी प्रेरणा आहे. ते आपल्या सर्वांना खूप काही शिकवते, असे मोदी म्हणाले.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिलमधील विरांना मानवंदना दिली. तसेच युद्धकाळातील वर्तनाबाबत देशवासियांना मोलाचा सल्ला दिला. यावेळी, युद्धकालीन परिस्थितीमध्ये आम्ही जे काही बोलतो त्याचा सीमेवर उभ्या असलेल्या जवानांच्या आणि त्यांच्या कुटंबीयांच्या मनोधैर्यावर थेट परिणाम होत आसतो. ही गोष्ट आपण विसरता कामा नये. आमचे वर्तन, आमचा व्यवहार, आमची वाणी, आमची विधाने, आमच्या मर्यादा आणि आमचे लक्ष्य या सर्वामध्ये आपण जे काही करत आहोत, त्यामुळे सैनिकांचे मनोधैर्य वाढले पाहिजे. तसेच त्यांच्या सन्मान वाढला पाहिजे, असेही मोदी म्हणाले.
पंतप्रधान दर महिन्याच्या अखेरच्या रविवारी देशातील जनतेशी संवाद साधतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ते देशाच्या ताज्या स्थितीशी संबंधित अनेक घटनांचा परिचय जनतेला करून देतात.
महत्त्वाच्या बातम्या -
"पापड खाओ कोरोना भगाओ..."; पंतप्रधान मोदींच्या मंत्र्याचा दावा - व्हिडिओ व्हायरल
भारत-इस्रायलची कमाल!; आता फक्त आवाज अन् श्वासावरून मिळणार कोरोना चाचणीचा अहवाल
CoronaVirus Vaccine : ऑक्सफर्डची लस पास होणार की फेल?; मुंबई-पुण्यात मोठी टेस्ट
100 कोटींचे बजेट, 3 मजले अन् तब्बल 318 खांब... असे असेल अयोध्येतील भव्य राम मंदिर