नवी दिल्ली - प्रेमासाठी अनेक जण वाटेल ते करतात. त्यांच्या प्रेमाचे भन्नाट किस्से हे नेहमीच ऐकायला मिळतात. अशीच एक घटना आता समोर आली आहे. एका लग्नाची जोरदार चर्चा रंगली आहे. एका प्रियकराने कोणालाही भनक न लागता त्याच्या प्रेयसीला तब्बल दहा वर्ष एकाच रुममध्ये लपवून ठेवलं. आश्चर्य म्हणजे त्याच्या घरातील सदस्यांनाही त्यांच्या घरात 10 वर्षापासून एक अज्ञात युवती राहतेय त्याची कल्पना नव्हती. त्यानंतर आता या दोघांनी कायदेशीर लग्न केल्याची घटना समोर आली आहे.
या अजब प्रेमाची सुरूवात फेब्रुवारी 2010 मध्ये झाली तेव्हा 18 वर्षीय सजिथा नावाची एक मुलगी अचानक घरातून गायब झाली. सजिथा केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील आईलूर येथील तिच्या राहत्या घरातून गायब झाली होती. नातेवाईकाकडे जाण्याच्या बहाण्याने ती घरातून बाहेर पडली ती कधीच परतली नाही. ना ती नातेवाईकांच्या घरी गेली ना स्वत:च्या घरी आली. घरातून बाहेर गेलेली सजिथा बेपत्ता झाली. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर जेव्हा सजिथा घरी परतली नाही तेव्हा तिच्या घरच्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला परंतु सजिथा ठावठिकाणा लावण्यास त्यांनाही अपयश आलं.
"आम्ही गेल्या दहा वर्षांपासून एकत्र राहत आहोत"
सजिथा तिच्याच गावातील 24 वर्षीय मुलावर प्रेम करत होती. रेहमान आणि सजिथा एकाच गावात राहत होते. त्यांच्या या प्रेमाची कुटुंबाला, मित्रांना आणि नातेवाईकांना काहीच माहिती नव्हती. याच गोष्टीचा फायदा घेत दोघांनीही हा प्लॅन बनवला. दहा वर्ष कोणालाही भनक न लागता ते दोघंही एकाच छताखाली राहत होते. जेव्हा या प्रकरणाचा खुलासा झाला तेव्हा रेहमान विरोधात तक्रार करण्यात आली होती. यानंतर पोलिसांनी दोघांना कोर्टात हजर केलं. यावेळी त्यांनी सांगितलं की, आम्ही गेल्या दहा वर्षांपासून एकत्र राहत आहोत. आणि भविष्यातही एकत्र राहण्याची इच्छा आहे. कोर्टाने त्यांना एकत्र राहण्याची परवानगीदेखील दिली आहे.
पलक्कड जिल्ह्यातील नेनमारामध्ये केलं लग्न
जेव्हा रेहमानच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती झाली तेव्हा काही जण खूप खूश झाले तर अनेकांना हे आवडलं नाही. मात्र यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांनी पलक्कड जिल्ह्यातील नेनमारामध्ये कायदेशीर लग्न केलं. यावेळी सजिथाचे आई-वडील लग्नात सामील झाले. मात्र रेहमानचे काही नातेवाईक नाखूश असल्याने ते या लग्नाला आले नाहीत. यावेळी लग्नात रेहमान आणि सजिथाने मिठाई देखील वाटली आणि लग्नात आल्याबद्दल सर्वांचे आभार मानले. तसेच रेहमानने आम्हाला सुखी जीवन जगायचं असल्याचं सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.