वाराणसी- यूपीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने बलियामध्ये कर्नाटक बँकेची बनावट शाखा सुरू केल्याची घटना समोर आली आहे. बलियाच्या मुलायम नगरमध्ये असणाऱ्या या बनावट शाखेवर पोलिसांनी बुधवारी धाड टाकली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक कडून त्याच्याकडून 1 लाख 37 हजार रूपये जप्त केले आहेत. आफाक अहमद असं या व्यक्तीचं नाव असून तो विनोद कुमार कांबळी या नावाने शाखा चालवत होता. विशेष म्हणजे स्वतः मुंबईचा असल्याची बतावणी त्याने केली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
अहमदने विनोद या नावाने बनवाट आधार कार्ड तसंच इतर ओळख पत्रंही तयार केली होती. अहमदने या बनावट शाखेच्या माध्यमातून 1 लाख 37 हजार रूपये जमा केले होते. बलियातील 15 स्थानिकांचे अकाऊंट उघडून त्याने ही रक्कम जमा केली होती. अहमदच्या ऑफिसमधून मोठ्या प्रमाणात स्टेशनरी, फॉर्म, पासबुक, तीन कॉम्युटर, लॅपटॉप, फर्निचर आणि इतर साहित्य जप्त करण्यात आलं आहे. कर्नाटक बँकेच्या वाराणसी कार्यालयातील अधिकारी हितेंद्रा कृष्णा, बीबीएच उपाध्याय इतर सहकाऱ्यांसह बलियामधील बँकेच्या बनावट शाखेत पोहचले होते. तेव्हा त्यांनी ही माहिती पोलिसांना कळविली.
बँकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनंतर मोठ्या पोलीस बंदोबस्तात या बनावट शाखेवर धाड मारण्यात आली. मुलायम नगरमध्ये एका माजी सैनिकाच्या घरातून बँकेची ही बनावट शाखा चालविली जात होती.