नवी दिल्ली - ऑनलाईन खरेदी करण्याकडे अनेकांचा अधिक कल असतो. सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांकडून देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भरपूर ऑफर्सही दिल्या जातात. ऑफर्स असल्याने ग्राहक देखील ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात. मात्र अनेकदा ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर फसवणूक झाल्याच्या घटना या समोर आल्या आहेत. अशीच एक घटना समोर आली आहे. फ्लिपकार्टवरून एका व्यक्तीने पॉवरबँक मागवली होती. मात्र प्रत्यक्षात घरी विटेचा तुकडा आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ऑनलाईन ऑर्डर केलेल्या वस्तूचा बॉक्स उघडल्यानंतर ग्राहकाला धक्काच बसला. त्याने सोशल मीडियावर त्याला आलेला अनुभव शेअर केला आहे. ट्विटरवर @RahulSi27583070 नावाच्या युजरने काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्याने 2000 mAh ची पॉवरबँक मागवली होती, पण त्याला बॉक्स ओपन केल्यानंतर विटेचा तुकडा मिळाला आहे. यानंतर त्याने या सगळ्या प्रकरणाची फ्लिपकार्टला टॅग करुन याबाबत माहिती दिली आहे. असाच अनुभव अनेकांना आला आहे, जो त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केला आहे. एकाने लायटर मागवलं तर घरी आले नटबोल्ट. तर एका व्यक्तीला रिकामाच बॉक्स पाठवण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.