नवी दिल्ली: सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीविरोधात शाहीन बागेत सुरू असलेल्या आंदोलनात आज एक बंदुकधारी घुसल्यानं खळबळ निर्माण झाली. या बंदुकधाऱ्यानं आंदोलकांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. आज दुपारच्या सुमारास शाहीन बागेत दोन जण घुसले होते. त्यातल्या एकाकडे बंदूक होती. आंदोलकांनी संपूर्ण परिसर रिकामा करावा. अन्यथा माणसं मारली जातील, अशी धमकी या व्यक्तीनं दिली. या व्यक्तीला आंदोलकांनी ताब्यात घेतलं. दुपारी तीनच्या सुमारास बंदुकीसह शाहीन बागेत घुसलेल्या एका व्यक्तीनं व्यासपीठावर चढून उपस्थितांना आंदोलन संपवण्यासाठी धमकावलं. काही उपस्थितांनी त्याला पकडून त्याच्या हातातली बंदूक काढून घेतली. यानंतर त्याला मारहाणदेखील करण्यात आली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शी सईद तासीर अहमदनं दिली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शाहीन बाग आंदोलनाशी संबंधित एका ट्विटर अकाऊंटवरुनदेखील हा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. 'आंदोलन परिसरात बंदुकधारी समाजविघातक घटकांची घुसखोरी', या मजकूरासह हा व्हिडीओ प्रसिद्ध करण्यात आला आहे.
VIDEO: परिसर मोकळा करा, अन्यथा माणसं मरतील; शाहीन बागेत बंदुकधारी घुसल्यानं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 8:26 PM