चांगल्या पगाराची नोकरी करणं हे अनेकांचं स्वप्न असतं. पण तुम्हाला जर कोणी वर्षाला एक कोटी पगार असलेली नोकरी सोडल्याचं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण हो हे खरं आहे. एका व्यक्तीने शेतीशी संबंधित काम करण्यासाठी तब्बल 1 कोटी रुपये पगाराची नोकरी सोडली. रुचित गर्ग असं या व्यक्तीचं नाव आहे.
रुचित गर्ग हे हैदराबादच्या मायक्रोसॉफ्टमध्ये काम करत होते. याच दरम्यान त्यांची रेडमंड येथील कंपनीच्या मुख्यालयात बदली झाली. काही काळानंतर रुचित यांनी भारतात परतण्याचा आणि शेतकऱ्यांसाठी स्टार्टअप सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. अखेर 2011 मध्ये त्यांनी नोकरी सोडून नवं स्वप्न पाहिलं.
रुचित गर्ग यांनी मनीकंट्रोलला सांगितलं की, मला कंटाळा आला होता. मला नेहमीच माझा स्वतःचा व्यवसाय हवा होता. यासाठी मी 2004 मध्ये माझं नशीब आजमावलं. हा तो काळ होता जेव्हा स्टार्टअपची क्रेझ अजून सुरू झाली नव्हती. पण, 2011 मध्ये, जेव्हा मी अमेरिकेत स्टार्टअप्स वेगाने वाढत असल्याचं पाहिलं, तेव्हा मी परत यायचं ठरवलं.
रुचित यांनी हार्वेस्टिंग फाऊंडेशन लाँच केलं, या कंपनीचे उद्दिष्ट पीक विकणं आणि मध्यस्थांना दूर करून शेतकऱ्यांपर्यंत चांगले व्यवहार पोहोचवणं हा आहे. याचा भारतातील 37 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाल्याचा दावा कंपनीने केला आहे.
माझे आजोबा उत्तर प्रदेशातील मुरादाबादजवळील एका गावात शेतकरी होते. त्यामुळे मला या क्षेत्रात काहीतरी अर्थपूर्ण करायचे होते. आमची कंपनी हार्वेस्टिंग, लहान शेतकऱ्यांना अधिक पैसे कमविण्यास मदत करते. आम्ही शेतकऱ्यांना त्यांची पिके वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींमध्ये मदत करतो, जसे की सल्ला, बियाणे, कीटकनाशके इ. आणि त्यांची पिके ऑनलाइन आणि ऑफलाइन विकण्यास मदत करतो असं गर्ग यांनी सांगितलं.