ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 8 - "अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतरही मनमोहन सिंग यांच्या चारित्र्यावर एकही डाग लागलेला नाही. बाथरूममध्ये रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला केवळ डॉ. मनमोहन सिंग यांनाच अवगत आहे," अशी बोचरी टीका मोदींनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावeवर बोलताना केली. मोदींची ही टीका जिव्हारी लागल्याने काँग्रेस सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालत सभात्याग केला.
त्यानंतर नोटाबंदीवरून सरकारवर कठोर शब्दात टीका करणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरही मोदींनी टीकास्र सोडले. "मनमोहन सिंग हे मोठे अर्शशास्त्रज्ञ आहे. अनेक वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यानंतरही त्यांच्या चारित्र्यावर कोणताही डाग लागलेला नाही. बाथरूममध्ये रेनकोट घालून आंघोळ करण्याची कला मनमोहन सिंग यांनाच अवगत आहे," असे व्यंगबाण मोदींनी डॉ. सिंगांवर सोडले. त्यामुळे आधीच संतापलेल्या काँग्रेस सदस्यांनी सभागृहात गोंधळ घालत सभात्याग केला. त्यानंतर कठोर टीका केल्याच तेवढी टीका झेलण्याची तयारीदेखील ठेवली पाहिजे असा टोला मोंदींनी काँग्रेस सदस्यांना लगावला.
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यावाद प्रस्तावावर भाषण कराताना मोदीनी भ्रष्टाचाराविरोधातील लढाई ही राजकीय नसल्याचे सांगत नोटाबंदी आणि काळ्या पैशाविरोधात सुरू असलेल्या कारवाईला मिळत असलेल्या यशाचाही उल्लेख यावेळी केला. ते म्हणाले, नोटाबंदीनंतरच्या 40 दिवसांत 700 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. विरोधकांकडून काहूर माजवले जात असतानाही नोटाबंदीच्या निर्णयात सरकारची साथ दिली."
कॅसलेसच्या निर्णयाचेही मोदींनी समर्थन केले. ते म्हणाले, भीम अॅपसाठी कुणी कमिशन घेत नाही. सारे जग कॅशलेसच्या दिशेने जात आहे. भारतही त्यात मागे राहता कामा नये. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला लगाम घालण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नोटाबंदीच्या वादात रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांवर टीका करणे अयोग्य होते असेही मोदींनी सांगितले.
काँग्रेसचे पंतप्रधानांच्या वक्तव्यावर टीकास्त्र
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डॉ. मनमोहन सिंगांवर केलेल्या वैयक्तिक टीकेविरोधात काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. मनमोहन सिंग यांनी मोदींच्या वक्तव्याबाबत काहीही भाष्य करण्यास नकार दिला आहे. मोदींनी केलेली टीप्पणी असंसदीस असून, त्यांचे वक्तव अहंकारपूर्ण आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. तर पी. चिदंबरम यांनीही मोदींच्या वक्तव्यावर टीका केली आहे.