एका दुचाकीवरून दोन जण प्रवास करू शकतात. एखादं लहान मूल असल्यास तीन जण. पण एका दुचाकीवरून तब्बल ७ जण प्रवास करत असतील तर? उत्तर प्रदेशात असा प्रकार घडला आहे. या दुचाकीवरील प्रवाशांचा फोटो वाहतूक पोलिसांनी ट्विटरवरून शेअर केला आहे. विशेष म्हणजे प्रवाशांचा पराक्रम पाहून पोलिसानं त्यांच्यासमोर हात जोडले आहेत. चलानला नको, यमराजाला घाबरा, अशा समर्पक शीर्षकासह पोलिसांनी हा फोटो ट्विट केला आहे.
वाहतुकीचे नियम पाळण्याचं आवाहन वारंवार करण्यात येतं. त्यासाठी जनजागृती केली जाते. वाहतूक सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात येतं. नियम हे लोकांच्या सुरक्षेसाठीच असतात. मात्र काहींना ही गोष्ट समजतच नाही. नियम मोडल्यास दंड होऊ शकतो याचीही भीती त्यांना नसते.
पोलिसांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केलेला फोटो एटा जिल्ह्यातला आहे. त्यात दुचाकीवर एक पुरुष, एक महिला यांच्यासह ५ मुलं कशीबशी बसली आहेत. दुचाकी चालवणाऱ्या पुरुषानं हेल्मेटदेखील घातलेलं नाही. दुचाकीवरील सगळ्यांना पाहून पोलिसानंदेखील हात जोडले.