उच्च न्यायालयात आत्महत्येचा प्रयत्न, मुख्य न्यायाधीशांसमोरच एका व्यक्तीने आपला गळा कापला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2024 08:24 AM2024-04-04T08:24:06+5:302024-04-04T08:25:07+5:30
मुख्य न्यायाधीश निलय विपिनचंद्र अंजारिया यांनी उच्च न्यायालयाच्या परिसरातील सुरक्षेतील त्रुटींबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
कर्नाटकउच्च न्यायालयाच्या परिसरात बुधवारी एक धक्कादायक घटना घडली. याठिकाणी एक व्यक्ती चाकू घेऊन आला आणि त्याने मुख्य न्यायाधीश निलय विपिनचंद्र अंजारिया यांच्यासमोर गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान एकच गोंधळ उडाला. श्रीनिवास असे या व्यक्तीचे नावा आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हैसूर येथील रहिवासी असलेल्या श्रीनिवासने कोर्ट रूम क्रमांक 1 च्या प्रवेशद्वारावर सुरक्षा कर्मचाऱ्यांकडे एक फाईल दिली आणि कोणालाही काही समजण्यापूर्वीच त्याने मुख्य न्यायाधीशांच्यासमोर आपला गळा चिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला बोरिंग रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याच्यावर आता उपचार सुरू आहेत.
श्रीनिवासने एवढे कठोर पाऊल का उचलले हे आम्हाला कळत नाही. कोर्ट रूम क्रमांक 1 मध्ये घुसून त्याने चाकूने गळा चिरला. आमच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हे पाहताच तात्काळ त्याचाकडून चाकू काढून घेतला आणि वाचवले. यानंतर लगेच त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी आढळून आली नाही, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
या घटनेनंतर मुख्य न्यायाधीश निलय विपिनचंद्र अंजारिया यांनी उच्च न्यायालयाच्या परिसरातील सुरक्षेतील त्रुटींबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच, ती व्यक्ती धारदार शस्त्र घेऊन न्यायालयाच्या परिसरात कशी घुसली, असा सवाल प्रशासनाला केला. याशिवाय, घटनास्थळी सापडलेल्या पुराव्याची नोंद करण्याचे आदेशही त्यांनी पोलिसांना दिले.
दरम्यान, श्रीनिवासने सुरक्षा कर्मचाऱ्यांना दिलेल्या फाईलमधील मजकूर अज्ञात आहे. न्यायालयाने सांगितले की, संबंधीत कागदपत्रे तपासणार नाही, कारण ती एका नामांकित वकिलाने न्यायालयात सादर करण्यात आली नाही. न्यायालयाच्या आदेशाशिवाय अधिकाऱ्यांनी कोणतेही कागदपत्रे मिळवू नये, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच, श्रीनिवासने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याचा तपास पोलीस करत आहेत.