त्रिपुरा - गरिबीमुळे कधी कुणाला कोणते पाऊल उचलावे लागेल, हे सांगत येत नाही. गरिबीने पिचलेल्या अशाच एका बापानं पोटच्या 8 महिन्यांच्या मुलीला फक्त 200 रुपयांना विकल्याची घटना त्रिपुरामध्ये घडली आहे. तेलियामुरातील महारानीपूर येथील आदिवासी पाड्यावरील ही धक्कादायक घटना आहे. गरिबीला कंटाळून मुलीला विकण्याचे कठोर पाऊल उचलले, असे मुलीच्या वडिलांनी सांगितले. एकीकडे केंद्र सरकारकडून 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' योजना राबवली जात असताना, दुसरीकडे अशा प्रकारच्या मन पिळवटून टाकणा-या घटना समोर येत आहेत. यापूर्वीही देशाच्या विविध भागातून गरिबीचा दाखला देत मुलींना विकण्यात आल्याच्या कित्येक घटना समोर आल्या आहेत. केवळ मुलींनाच नाही तर मुलांनादेखील कुटुंबीयांकडून विकण्यात आले आहे.
ओडिशामध्ये बाळाला दोन हजारांत विकलेएका आदिवासी महिलेला आपले दोन दिवसांचे नवजात बाळ दुसऱ्या एका महिलेला दोन हजार रुपयांत विकावे लागल्याची घटना ओडिशाच्या केंद्रपाडा जिल्ह्यातील काजला या आदिवासी पाड्यात घडली. गीता मुर्मू असे या दुर्दैवी मातेचे नाव आहे. सहा वर्षांची मुलगी आणि 10 वर्षांच्या मुलाची आई असलेली गीता तिसऱ्यांदा गर्भवती असताना तिचा नवरा सोडून गेला. ‘नवऱ्याने दोन्ही मुले माझ्याजवळ सोडून माझा त्याग केला. आम्हाला धड दोनवेळचे जेवणही मिळत नाही. अशात तिसऱ्याला कसे पोसणार? तिसऱ्या मुलाचा सांभाळ करू शकत नसल्याने त्याला विकण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता,’ असे गीता म्हणाली.
दारू व मोबाइलसाठी बापानं 11 महिन्यांच्या मुलाचा 25 हजारांत केला सौदा केवळ दारू आणि मोबाइल फोन विकत घेण्यासाठी बापानं स्वतःच्या 11 महिन्यांच्या मुलाचा केवळ 25 हजार रुपयांमध्ये सौदा केल्याची धक्कादायक बाब काही दिवसांपूर्वी समोर आली होती. ओडिशातील भद्रक जिल्ह्यातील ही घटना आहे. बलराम मुखी असे आरोपीचे नाव असून त्यानं स्वतःच्या 11 महिन्यांच्या मुलाला केवळ दारू आणि मोबाइल फोनसाठी 25 हजार रुपयांना विकले. याप्रकरणी पोलिसांनी या लालची बापाच्या मुसक्या आवळल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बलराम मुखीनं दारू व मोबाइल फोनसाठी 25 हजार रुपयांना आपल्या मुलाला विकले. मिळालेल्या या रकमेतून त्यानं दोन हजार रुपयांचा मोबाइल फोन आणि सात वर्षांच्या मुलीसाठी त्यानं 1500 रुपयांचे पैजण विकत घेतले व उरलेले सर्व पैसे त्यानं फक्त दारू खरेदीवर खर्च केले होते.