तामिळनाडूच्या त्रिचीमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. 60 वर्षांच्या लेकाला आपल्या वृद्ध आईचा मृतदेह व्हिलचेअरवर ठेऊन स्मशानभूमी गाठवी लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुरुगानंदन असं या व्यक्तीचं नाव असून यांच्याकडे आईच्या अंत्यसंस्कारासाठी पैसे नव्हते. कोणत्याही नातेवाईकांनी देखील मदत केली नाही. आई बऱ्याच दिवसांपासून आजारी होती. कोणीच मदत करणार नाही, असा विचार करून मुरुगानंदन एकटेच आईचा मृतदेह घेऊन स्मशानभूमीत पोहोचले.
मुरुगानंदन इलेक्ट्रिशन आहेत. आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुरसे पैसे नसल्याचं त्यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना सांगितली. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली. त्यामुळे मुरुगानंदन यांच्या आईवर अंत्यसंस्कार होऊ शकले. स्मशानभूमीत काम करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे मुरुगानंदन यांनी त्यांची व्यथा मांडली. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आईवर अंत्यसंस्कार केले आणि मृत्यू प्रमाणपत्र मिळवून देण्यासही मदत केली.
मुरुगानंदन यांची 84 वर्षीय आई राजेश्वरी यांच्यावर अनेक वर्षांपासून उपचार सुरू होते. त्यांना सोरायसिसचा त्रास होता. बुधवारी राजेश्वरी यांची प्रकृती खालावली. त्यांनी कुटुंबियांना राजेश्वरी यांना घरीच उपचार सुरू ठेवण्याचा सल्ला दिला. त्यानंतर राजेश्वरी यांचं निधन झालं.
मुरुगानंदन आपल्या आईचा मृतदेह व्हिलचेअरवर ठेऊन स्मशानभूमीत पोहोचले. त्यांच्याकडे मृत्यू प्रमाणपत्र नव्हतं. ते मिळवून देण्यात स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनी त्यांना मदत केली. मुरुगानंदन यांच्या कुटुंबात वडील पेरियासामी आणि दोन भाऊ आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.