बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात बिबट्याची दहशत पाहता अनेक गावांमध्ये पिंजरे लावण्यात आले आहेत. गुरुवारी रात्री अशाच पिंजऱ्यात एक व्यक्ती अडकला. माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांनी या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर टाकला. यानंतर हा व्हिडिओ काही वेळातच चांगलाच व्हायरल झाला. टीव्ही9 हिंदीने याबाबचा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
शुक्रवारी दुपारपर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे, तर हजारो लोकांनी त्याला लाईक, कमेंट आणि शेअर केले. मिळालेल्या माहितीनुसार, बुलंदशहरमध्ये सध्या बिबट्याची दहशत आहे. बिबट्याला पकडण्यासाठी अनेक ठिकाणी पिंजरेही लावण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पिंजऱ्यांमध्ये चारा म्हणून कोंबडा ठेवला होता.
गुरुवारी रात्री बिबट्याच्या चाऱ्यासाठी बांधलेली कोंबडी चोरण्यासाठी एक व्यक्ती या पिंजऱ्यात घुसला होता. त्याने कोंबडीला हात तावताच पिंजऱ्याचा दरवाजा पडला आणि तो त्यात अडकला. शुक्रवारी सकाळी जेव्हा लोक पिंजऱ्याजवळ पोहोचले तेव्हा त्यांना त्यामध्ये अडकलेला व्यक्ती दिसला आणि त्यांनी व्हिडिओ बनवला.
गाव गोळा झाल्यावर त्या माणसाला पिंजऱ्यातून बाहेर काढण्यात आले. त्याची चौकशी केली असता पिंजऱ्यातील कोंबडा चोरण्यासाठी गेल्याचे त्याने सांगितले. यानंतर लोकांनी त्याचा खूप अपमान केला आणि इशारा देऊन निघून गेले. दररोज एक कोंबडा तर कधी शेळी पिंजऱ्यात बांधली जात असली तरी बिबट्या हातात येत नसल्याचे स्थानिकांनी सांगितले.