नवी दिल्ली: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल Ajit Dovals यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न एका अज्ञात व्यक्तीनं केला आहे. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखलं. अज्ञात व्यक्ती कार घेऊन डोवालांच्या निवासस्थानी शिरण्याचा प्रयत्न करत होता. सुरक्षा रक्षकांनी त्याला ताब्यात घेतलं. सध्या त्याची चौकशी सुरू आहे. दिल्ली पोलिसांचं स्पेश सेल त्याची चौकशी करत आहे.
अजित डोवालांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची मानसिक स्थिती ठीक नसल्याचं पोलीस चौकशीतून समोर आलं. त्याच्याकडे असलेली कार त्यानं भाड्यानं घेतली होती, असाही तपशील प्राथमिक चौकशीतून समजला आहे. पकडला गेल्यानंतर तो काहीतरी बडबडत होता. माझ्या शरीरात कोणीतरी चीप लावली आहे. मला रिमोट कंट्रोलनं चालवण्यात येत आहे, असं तो म्हणत होता. मात्र त्याच्या शरीरात कोणतीही चीप आढळून आलेली नाही.सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतलेली व्यक्ती कर्नाटकच्या बंगळुरूत वास्तव्यास आहे. दिल्ली पोलिसांची विशेष शाखा, दहशतवादविरोधी पथक त्याची चौकशी करत आहे. त्याला लोधी कॉलनीतील स्पेशल सेलच्या कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आलं आहे. अजित डोवाल अनेक दहशतवादी संघटनांच्या निशाण्यावर आहेत. गेल्या वर्षी फेब्रुवारीत जैशच्या दहशतवाद्याकडे डोवालांच्या कार्यालयाच्या रेकीचा व्हिडीओ सापडला होता. त्यानं तो व्हिडीओ पाकिस्तानातील हँडलरला पाठवला होता. त्यानंतर डोवाल यांची सुरक्षा वाढवली गेली.