नवी दिल्ली - पोलिसांबद्दल सर्वसामान्य नागरिकांच्या मनात नेहमीच भीती असते. तसेच, पोलीस म्हणजे भ्रष्टाचारी, गरिबांची पिळवणूक करणारे असाही समज अनेकांचा असतो. मात्र, काही पोलीस आपल्या कृतीतून पोलिसांबद्दलचा हा समज पुसून टाकतात. उत्तर प्रदेशमधील एका पोलीस अधिकाऱ्यानेही पोलिसांबद्दल लाख-मोलाचा आदर वाटावा, असे कृत्य केले आहे. लखनौच्या चौक ठाण्यातील अखिलेश मिश्र यांनीही आपल्या खाकी वर्दीत लपलेला माणूस समाजाल दाखवून दिला आहे.
लखनौ चौक ठाण्यातील पोलीस निरीक्षक अखिलेश मिश्र यांना आठ वर्षांपूर्वी एक अनाथ मुलगी भेटली होती. त्यावेळी गुडम्बा पोलीस ठाण्यात अखिलेश आपले कर्तव्य बजावत होते. या कर्तव्यावर असताना भेटलेल्या 10 वर्षीय मुलीला अखिलेश यांनी सोबत घेऊन आपल्या मुलीप्रमाणे सांभाळले. विशेष म्हणजे नुकतेच या मुलीचे लग्न लावून अखिलेश यांनी कन्यादानही केले. जौनपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या या लग्नसोहळ्याला पोलीस खात्यातील लोकांसह अनेकांनी मोठी गर्दी केली होती.
जानकपूरम येथील रहिवाशी असलेले अखिलेश सध्या चौक ठाण्यात पोलीस निरीक्षक आहेत. जवळपास 8 वर्षांपूर्वी गुडम्बा ठाण्यात कर्तव्य बजावत असताना, अखिलेश यांना भटंकती करणारी 10 वर्षीय मुलगी भेटली होती. त्यावेळी, अखिलेश यांनी मुलीला तिच्याबद्दल विचारपूस केली. मात्र, तिला काहीही सांगता आले नाही, तर पोलीस यंत्रणांचे सहकार्य घेऊनही तिच्या कुटुंबीयांबद्दल अखिलेश यांना काहीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे अखिलेश यांनी अखेर तिला आपल्या घरी आणले. अगोदरच, दोन मुले आणि दोन मुली असा परिवार असलेल्या अखिलेश यांनी कुटुंबातील पाचवे अपत्य बनवून या अनाथ मुलीच्या पित्याची जबाबदारी निभावली.
अखिलेश यांनी तनु मिश्रा असे या मुलीचे नाव ठेऊन तिला शिक्षणही दिले. त्यानंतर, मुलगी लग्नायोग्य होताच, जौनपूर येथील घनश्याम उपाध्याय यांचा मुलगा पंकजसोबत तिचे लग्न लाऊन दिले. गेल्या महिन्यातील 20 एप्रिल रोजी हा विवाहसोहळा पार पडला. अखिलेश यांनी आपल्या तुलापूर या मूळगावी वडिलांची जबाबदारी पार पाडत तनुचे थाटामाटात लग्न लावले. त्यामुळे अखिलेश यांच्या या कृतीचे संपूर्ण पोलीस दल आणि जिल्ह्यातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे. दरम्यान, आपल्या कुटुंबापासून दूरावल्यानंतर तनुला मानसिक धक्का बसला होता. मात्र, अखिलेश यांच्या कुटुंबात मला खूप प्रेम मिळाल, या मी या कुटुंबाचाच भाग बनले. त्यामुळे अखिलेश हे माझ्यासाठी केवळ वडिल नसून देवच असल्याचं तनुने लग्नावेळी म्हटले. अखिलेख यांच्या एका कृतीमुळे संपूर्ण पोलीस दलाबद्दल कृतज्ञता वाढीस लागली असून समाजाने वर्दीतली माणूसकी पाहिली आहे.