रात्री डॉक्टरांनी 'त्याला' मृत घोषित केलं, अन् दुसऱ्या दिवशी सकाळी...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 11:30 AM2019-06-22T11:30:45+5:302019-06-22T11:31:55+5:30
रात्रीच उपचार मिळाले असते, तर तो वाचण्याची शक्यता होती.
एकीकडे डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांचा विषय चांगलाच तापला असताना, मध्य प्रदेशातडॉक्टरांच्या निष्काळजीपणाचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. गुरुवारी रात्री मृत घोषित केलेली व्यक्ती शुक्रवारी सकाळी पोस्ट मॉर्टेमसाठी नेताना जिवंत असल्याचं निदर्शनास आलं आणि एकच खळबळ उडाली. या वृद्ध व्यक्तीवर पुन्हा लगेचच उपचार सुरू करण्यात आले खरे, पण त्याचा उपयोग झाला नाही. कदाचित रात्रीच उपचार मिळाले असते, तर तो वाचण्याची शक्यता होती.
त्याचं झालं असं की, किशन काशीराम या ७२ वर्षीय इसमाचा हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची माहिती डॉ. अविनाश सक्सेना यांनी गुरुवारी रात्री ९ वाजता पोलिसांना कळवली होती. त्यानुसार, शुक्रवारी सकाळी शवविच्छेदनासाठी पोलीस हॉस्पिटलमध्ये पोहोचले. त्यावेळी वृद्धाचा श्वासोच्छवास सुरू असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. इतक्यात, तो रुग्ण जागा झाला आणि रडू लागला. हे पाहून डॉक्टरांची धावाधाव झाली. त्यांनी तातडीने सलाईन लावून त्याच्यावर उपचार सुरू केले, पण काही वेळातच त्याचा मृत्यू झाला.
Madhya Pradesh: A man who was declared dead by doctors last night in District Civil Hospital, Sagar, was found alive today morning when he was taken for postmortem. DR RS Roshan (CMO) says,"The negligence done by the doctor will be investigated." pic.twitter.com/D1rATuTmmA
— ANI (@ANI) June 21, 2019
किशन काशीराम हे एकटेच हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांबद्दल काही माहिती मिळू शकलेली नाही. परंतु, रुग्णालय प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाल्याचं मान्य केलं आहे. संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आर एस रोशन यांनी स्पष्ट केलं.
काही जाणकारांच्या मते, न्यूमोनियाच्या काही रुग्णांच्या बाबतीत असा प्रकार घडतो. त्यांच्या हृदयाचे ठोके बंद पडल्यानं डॉक्टर त्यांना मृत घोषित करतात, पण थोड्या काळानंतर रुग्णांची श्वसनक्रिया पुन्हा सुरू होते. किशन काशीराम यांच्याबाबतीतही तसंच काहीसं घडलेलं असू शकतं.