नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशमधीलबर्फवृष्टी ही अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य आणते. तसेच हिमवर्षावर हा सुखावह असतो. मात्र कित्येकदा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झालेली बर्षवृष्टी अडचणीची ठरू शकते. काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अशीच एक घटना समोर आली आहे. लाहौल स्पितीमध्ये बर्फामध्ये रुग्णवाहिका अडकली. एका 70 वर्षीय रुग्णास कुल्लू येथील रुग्णालयात रुग्णवाहिकेमधून नेत असताना लाहौल स्पिती येथे ती बर्फात अडकली. रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्न करून अखेर रुग्णाला रुग्णालयात पोहोचवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नॉर्थ पोर्टलपासून लाहौलकडे जाण्यासाठी ही रुग्णवाहिका थोडीशी पुढे गेली. मात्र पुढे जाताच ती तीन फूट खोल बर्फात अडकली. या रुग्णवाहिकेमध्ये ड्रायव्हर गोपाल बोध, फार्मासिस्ट जयललिता आणि लक्ष्मी चंद नावाचा एक कर्मचारी होता. रुग्णवाहिका बर्फामध्ये अडकताच या तिघांनी पुन्हा मागे न फिरता पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि फावड्याच्या सहाय्याने बर्फ हटवण्यास सुरुवात केली. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्याचं सर्वत्र भरभरून कौतुक केलं जात आहे.
उणे 5 अंश सेल्सिअस तापमानात हे तिघेही अक्षरशः कुडकुडत होते. मात्र तरी देखील ते बर्फ हटवण्याचा प्रयत्न करत होते. पहिल्यादा गोपालने बर्फ हटवण्याचा प्रयत्न केला आणि नंतर लक्ष्मी चंदने. हे दोघेही थकून गेल्यानंतर फार्मासिस्ट जयललिता यांनी महिला शक्तीचे प्रदर्शन करीत हातात फावडे घेऊन बर्फ हटवण्यास सुरुवात केली. जसा जसा बर्फ हटवला जात होता तस तशी गाडी पुढे जात होती. अशा प्रकारे त्यांनी जवळपास 4 किलोमीटरचे अंतर पार केले. या स्थितीमुळे कुलूला (Kullu) पोहोचण्यासाठी त्यांना 2 तास जास्त लागले.
कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे रुग्णाला वेळेत आणि योग्य उपचार मिळाले
काही वेळाने त्यांना कटरच्या सहाय्याने बर्फ हटवणारी बीआरओची मशीन मिळाली. कर्मचाऱ्यांनी केलेल्या अथक प्रयत्नांमुळे रुग्णाला वेळेत आणि योग्य उपचार मिळाले. तसेच आता रुग्णाची स्थिती चांगली असल्याची माहिती मिळत आहे. लाहौलमध्ये गेल्या चार दिवसांपासून जोरदार बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे येथील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. मनाली-केलांग-लेह महामार्ग बर्फवृष्टीमुळे ठप्प झाला आहे. स्थानिक रस्ते देखील बंद आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.