मनसर उत्खनन पुरावशेषांचे संग्रहालय नाही
By admin | Published: December 19, 2014 11:19 PM
पुरातत्त्व विभागाचे स्पष्टीकरण : जुन्या हायकोर्ट इमारतीत गॅलरी
पुरातत्त्व विभागाचे स्पष्टीकरण : जुन्या हायकोर्ट इमारतीत गॅलरीनागपूर : मनसर उत्खननातील पुरावशेषांच्या प्रदर्शनासाठी संग्रहालय बांधणे शक्य नसल्याचे पुरातत्त्व विभागाने स्पष्ट केले आहे. यासंदर्भात नागपूर विभागाचे अधीक्षक पुरातत्त्ववेत्ता ताष्कंद अलोणे यांनी शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर केले.देशातील पुरातन संस्कृती व सामाजिक परंपरांचे संशोधन करण्यासाठी उत्खनन करण्यात येते. त्यासाठी, पुरातत्त्व विभाग स्वत: उत्खनन करतोच, शिवाय दरवर्षी अनेक शासकीय व अशासकीय संस्थांनाही उत्खननाचे परवाने देतो. मनसर येथे संग्रहालय बांधण्याचा उद्देश नव्हता. संग्रहालय काही विशिष्ठ ठिकाणीच बांधले जाऊ शकते. पुरावशेषांच्या संग्रहालयासाठी विविध नवीन पदे निर्माण करावी लागतात. नागपूर जिल्ह्यात यापूर्वी नयाकुंड, टाकळघाट, खापा, तारसा, माहुरझरी इत्यादी ठिकाणी उत्खनन करण्यात आले आहे. यामुळे उत्खनन पूर्ण झाल्यानंतर सर्वच ठिकाणी संग्रहालय उभारणे शक्य नाही, असे मत पुरातत्त्व विभागाने नोंदविले आहे. पुरातत्त्व विभागाने संग्रहालय बांधण्यात असमर्थता दर्शविली असली तरी जुन्या हायकोर्ट इमारतीत मनसर येथील निवडक पुरावशेषांसाठी गॅलरी तयार करण्याची तयारी दाखविली आहे. जुन्या हायकोर्ट इमारतीत सर्व पुरावशेष सुरक्षित ठेवले जाणार आहेत. याशिवाय मनसर उत्खननाच्या क्षतिग्रस्त भागाच्या दुरुस्तीसाठी ३७ लाख रुपये खर्चाला मान्यता मिळाल्याची माहिती विभागाने प्रतिज्ञापत्रात दिली आहे. -------------------------चौकट....वेदची जनहित याचिकामनसर उत्खनन परिसर व पुरावशेषांच्या सुरक्षेसाठी विदर्भ जनकल्याण व विकास संस्थेने (वेद) जनहित याचिका दाखल केली आहे. उत्खननात सापडलेले पुरावशेष देशाची संपत्ती आहे. त्यांचे जतन करणे शासनाचे कर्तव्य आहे. मनसर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संग्रहालय बांधल्यास विदर्भातील पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.