ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. २७ - तेलंगणचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांनी आयोजित केलेल्या 'अयुथा महा चंडी यज्ञा'तील विधी सुरु असताना रविवारी दुपारी एका मंडपात आग भडकली होती. अग्निशमन दलाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली. यज्ञाचा शेवटचा टप्पा सुरु असताना ही आग लागली, या आगीत कोणीही जखमी झाली नसल्याची माहिती तेलंगणचे मंत्री के.टी.राव यांनी दिली.
रविवार यज्ञाचा शेवटचा दिवस आहे. मेडकमधील चंद्रशेखर राव यांच्या फार्महाऊसवर हा यज्ञ ठेवण्यात आला आहे. जागतिक शांततेसाठी चंद्रशेखर राव यांनी आयोजित केलेल्या या यज्ञावर सात कोटी रुपये खर्च केले आहेत.
तेलंगण, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूतून जवळपास दोन हजार भटजी या यज्ञामध्ये सहभागी झाले आहेत. आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू सकाळी या यज्ञासाठी आले होते. दुपारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी येणार आहेत.