नवी दिल्ली : देशात नियमितपणे होणाऱ्या विमान उड्डाणांप्रमाणेच चार्टर्ड विमानांतून प्रवास करणाऱ्यांनाही आरोग्य सेतू अॅप अनिवार्य करण्यात आले आहे. नागरी विमान उड्डाण मंत्रालयाने एक निवेदन जारी करून चार्टर्ड विमानांच्या प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली आहे.
प्रवाशाकडे कॉम्पेटिबल फोन असेल, तर त्याच्याकडे हे अॅप असणे अनिवार्य असेल. मात्र, तसा फोन नसेल तर त्याला स्वत:ला घोषणा करावी लागेल की, ते प्रतिबंधित क्षेत्रात राहत नाहीत आणि त्यांना कोरोनाची बाधा झालेली नाही, तसेच त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. या अॅपवर ग्रीन सिग्नल आल्यानंतरच प्रवाशाला विमानतळावर प्रवेश दिला जाणार आहे. १४ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या प्रवाशांना मात्र यातून सूट दिली जाणार आहे. विमानतळावर प्रवाशांची स्क्रीनिंग तसेच सुरक्षा चाचणीही केली जाणार आहे.
सामान्य प्रवासासाठी २ तास आधी विमानतळावर यावे लागेल, तर चार्टर्ड विमानांतून प्रवासासाठी ४५ मिनिटे आधी यावे लागेल.या प्रवाशांची नाव, पत्ता व फोन नंबर घेण्यास आॅपरेटरांना सूचित केले आहे. ही माहिती आपल्याकडे ठेवून त्या-त्या राज्यातील सरकारांनाही पाठविली जाणार आहे. भविष्यात यातील कुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे आढळल्यास त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती मिळविण्यास यामुळे मदत होणार आहे. (वृत्तसंस्था)