देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे. वेगाने लसीकरण मोहीम सुरू असून आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे. अशातच एक हटके घटना समोर आली आहे. भारत सरकारने कोरोनासारख्या साथीच्या आजाराला रोखण्यासाठी सुरू केलेली लसीकरण मोहीम आता बेपत्ता लोकांचा शोध घेण्यातही मदत करत आहे. हिमाचल प्रदेशामध्ये अशीच एक हैराण करणारी घटना घडली आहे.
मंडी (Mandi) जिल्हा मुख्यालयाला लागून असलेल्या सद्याणा (Sadyana) गावातील 22 वर्षीय नेहाला शोधण्यात कोरोना लसीने (Corona Vaccine) महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कौटुंबिक कारणामुळे नेहा (Neha) घर सोडून कुठे तरी निघून गेली होती. नेहाचा पती मोनू ठाकूर (Monu Thakur) यांनी 14 जुलै 2022 रोजी सदर पोलीस ठाण्यात नेहा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी नेहाला सर्वत्र शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र तिचा कुठेही पत्ता लागला नाही. दीड महिन्यापासून मोनूचं संपूर्ण कुटुंब नेहाला शोधत होतं. तिची दोन मुलंही आईसाठी रडत होती.
बेपत्ता नेहाने कोरोना लसीचा घेतला दुसरा डोस
गुरुवारी 1 सप्टेंबर 2022 रोजी मोनूच्या मोबाईलवर एक मेसेज आला. हा मेसेज कोविड लसीकरणाविषयी होता, ज्यामध्ये बेपत्ता नेहाने कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याची माहिती देण्यात आली होती. नेहाने ही लस शिमल्यातील तुतीकांडी येथील आरोग्य केंद्रात (Health Center) घेतली होती. हा मेसेज घेऊन मोनू पोलीस स्टेशनमध्ये पोहोचला आणि पोलिसांना कळवलं. मंडीच्या एसपींच्या सूचनेवरून स्टेशनचे प्रभारी इन्स्पेक्टर पुरुषोत्तम धीमान यांनी तत्काळ एक टीम तयार करून शिमल्याला पाठवली. यानंतर नेहा तिथे एका ढाब्यावर काम करताना आढळली.
कोरोना लसीमुळे बेपत्ता झालेल्या महिलेचा शोध
पोलिसांनी नेहाला मंडीला परत आणलं आणि तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आलं. मंडीच्या एसपी शालिनी अग्निहोत्री यांनी या प्रकरणाला दुजोरा दिला आहे. कोविड लसीकरणामुळे बेपत्ता नेहाबद्दल अचूक माहिती मिळाली आणि आता तिला तिच्या कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलं आहे, असं त्यांनी सांगितलंय. अशा रितीने कोरोना लसीमुळे बेपत्ता झालेल्या एका महिलेचा शोध घेण्यास मदत केली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.