'उद्धव ठाकरेंचे सिंहासन हलवलं'; जाहीर सभेत कंगना रणौत म्हणाली, 'तुमची औकात काय?'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 10:59 AM2024-05-22T10:59:04+5:302024-05-22T11:05:48+5:30
हिमाचलच्या मंडी मतदारसंघातून निवडणूक लढणाऱ्या कंगना रणौतने पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
Kangana Ranaut On Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. अशातच हिमाचल प्रदेशातून निवडणूक लढणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौतमुळे मंडी या लोकसभा मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. कंगनाने प्रचारादरम्यान तिच्या भाषणांमधून विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. दुसरीकडे हिमाचलच्या निवडणुकीत कंगनाने उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत त्यांच्यावर जोरदा निशाणा साधला. मी उद्धव ठाकरेंचे सिंहासन हलवलं होतं असे म्हणत त्यांनी समोरच्या उमेदवाराला आव्हान दिलं आहे.
हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपने अभिनेत्री कंगना रणौतला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर काँग्रेसने या मतदारसंघातून राजघराण्यातील वंशज विक्रमादित्य सिंह यांना उमेदवारी दिली आहे. मंडीतल्या या रंजक लढतीत दोन्ही नेते एकमेकांवर जोरदार हल्लाबोल करत आहेत. कंगना आणि विक्रमादित्य सिंह यांच्यात अनेक दिवसांपासून शाब्दिक युद्ध सुरू आहे. मात्र आता कंगनाने पुन्हा एकदा विक्रमादित्य सिंग यांच्यावर हल्ला चढवला आहे. विक्रमादित्य सिंग यांना त्ंयाच्या आईने त्याला स्त्रियांचा आदर करायला शिकवले नसेल, म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला.
"विक्रमादित्य सिंग यांनी मी भेट दिलेल्या मंदिरांना शुद्ध करावे लागेल असं म्हटलं. या बिघडलेल्या राजपुत्राला स्त्रियांचा आदर म्हणजे काय हे माहित नाही. कदाचित त्यांची आई प्रतिभा सिंह यांनी त्यांना स्त्रियांचा आदर करायला शिकवले नसेल. या लोकांनी मंडीच्या लेकींचा भाव विचारत आहेत. मात्र आता मंडीच्या मुलींचा अपमान आम्ही सहन करणार नाही. मी तर म्हणते डोंगरावरील महिलांमध्ये फार दम असतो. मी तर उद्धव ठाकरेंचं सिंहासनही हलवलं होतं. तुमची काय औकात आहे," असं आव्हान कंगनाने विक्रमादित्य सिंह यांना दिलं.
"मी तुमची अशी हालत करेन की तुम्ही भाजी मार्केटमधील भाज्यांचे भावही विसरुन जाल. हे कुटुंब कित्येक वर्षांपासून खुर्चीला चिकटून बसलं आहे. या लोकांकडे सत्ता होती, तरीही यांची भूक कमी होत नाही. ही सत्तेची भूकच त्यांनी घेऊन बुडेल. लोकांचा पैसा खाण्यासाठी या लोकांना सत्ता हवी आहे. मी पद्मश्री, फिल्ममेकर आहे. मी स्वत: कमवते. पण विक्रमादित्य काही कामाचे नाहीत. ते केवळ आई-वडिलांच्या नावे मतं खातात. यांच्यापेक्षा जास्त भ्रष्टाचारी कोणीच नाही," असेही कंगना रणौत म्हणाली.