नवी दिल्ली - हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील सुंदरनगर येथे उपचारासाठी आलेल्या एका वृद्ध महिलेला ड्युटीवर असलेल्या महिला डॉक्टरने कानशिलात लगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. महिला आणि तिच्या सोबत असलेल्या नातेवाईकांना काही समजण्यापूर्वीच डॉक्टरांनी एकामागून एक कानाखाली मारली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोटदुखीचा त्रास होत असलेल्या महिला रुग्णाची गंभीर स्थिती पाहून तिला नेर चौकातील श्री लाल बहादूर शास्त्री वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेले, तेथे महिलेवर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी रुग्णालय व्यवस्थापनाने कोणतीही कारवाई न केल्यास या संपूर्ण प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री सेवा संकल्प म्हणजेच 1100 क्रमांकावर पाठवण्यात आली आहे. बिमला देवी (60) असं या महिलेचं नाव असून यांच्यासोबत ही घटना घडली. त्या सुंदरनगर उपविभागांतर्गत येणाऱ्या जाडोळ ग्रामपंचायतीच्या तळी गावातील रहिवासी आहे. बिमला देवी यांनी सांगितले की त्या वेदनेमुळे ओरडत होत्या आणि डॉक्टरांनी त्यांना कानाखाली मारण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर डॉक्टरवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे.
महिलेचा मुलगा मनोज कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 वर्षांपूर्वी त्यांच्या आईवर याच रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉक्टरांनी सर्व जुने रेकॉर्ड आणण्यास सांगितले, मात्र ते घटनास्थळी उपस्थित नव्हते. यानंतर अचानक त्याच्या आईला महिला डॉक्टरने एकापाठोपाठ एक कानाखाली मारली. याबाबत महिला डॉक्टरला रुग्णाला का मारले असं विचारले असता डॉक्टरने रुग्णाला शांत करण्यासाठी असे करत असल्याचं उत्तर दिलं. त्यानंतर त्यांनी रुग्णाला मेडिकल कॉलेज नेरचोक येथे आणून 1100 क्रमांकावर तक्रार केली.
सिव्हिल हॉस्पिटल सुंदरनगरचे प्रभारी आणि एसएमओ डॉ चमन सिंग ठाकूर यांनी तक्रार मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 1100 क्रमांकावरून या घटनेची माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी निःपक्षपातीपणे चौकशी केली जाईल. सीसीटीव्ही फुटेजचीही तपासणी केली जाणार असून, घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर कर्मचाऱ्यांचीही चौकशी केली जाणार आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.