लग्नादरम्यान अनेक जण एकत्र राहण्याची शपथ घेतात. संसार करताना पती-पत्नी अनेक अडचणींचा सामना करतात. त्यांच्यातील नातं अतूट असतं. अशीच एक घटना आता समोर आली आहे. पती-पत्नीने जवळपास 50 वर्षे सुखी-संसार केला आणि आता दोघांनी एकत्र जगाचा निरोप घेतला. हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील सरकाघाटमध्ये ही घटना घडली आहे.
पत्नीच्या मृत्यूचं दु:ख सहन न झाल्याने पतीने देखील जीव गमावला आहे. काही तासांनंतर पतीचाही मृत्यू झाला आणि त्यामुळे दोघांवरही एकाच ठिकाणी एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यामुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंडी जिल्ह्यातील सरकाघाट येथील पंचायत देव ब्राडता येथील लोअर संदोआ गावातील हे प्रकरण आहे.
पत्नीच्या मृत्यूनंतर नव्वद वर्षांच्या पतीचा देखील मृत्यू झाला. लोअर सांडोआ येथे राहणारे रघुनंदन (90) हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक होते. त्यांची पत्नी इंद्री देवी (74) यांचे मंगळवारी दुपारी निधन झाले. पत्नीच्या मृत्यूला काही तास उलटले असतानाच अचानक पतीची तब्येत बिघडू लागली. रघुनंदन यांनीही सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. इंद्री देवी गेल्या काही वर्षांपासून कॅन्सरने त्रस्त होत्या.
इंद्री देवी यांचे निधन झाले. हा धक्का पतीला सहन झाला नाही. याच दरम्यान त्यांची प्रकृतीही खालावली आणि 6 तासांनंतर त्यांचा मृत्यू झाला. 90 वर्षीय रघुनंदन हे हिमाचल प्रदेश शालेय शिक्षण मंडळातून निवृत्त झाले होते आणि ते त्यांची पत्नी, 74 वर्षीय इंद्री देवी आणि मुलासोबत राहत होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.