अयोध्येमध्ये उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरामधील प्राणप्रतिष्ठापनेची तयारी वेगात सुरू आहे. एकीकडे प्राण प्रतिष्ठापनेची माहिती देण्यासाठी विश्व हिंदू परिषदेकडून घरोघरी अक्षत निमंत्रण देण्यात येत आहे. तर दुसरीकडे विरोधकांकडून टीकाटिप्पणीही होत आहे. यादरम्यान, बिहारची राजधानी असलेल्या पाटणा येथे लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाकडून पोस्टर लावण्यात आले आहे. तसेच त्यात मंदिर म्हणजे मानसिक गुलामगिरीचा मार्ग, अशी टीका करण्यात आली आहे.
लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांच्या निवासस्थानाबाहेर अनेक पोस्टर लागलेले आहेत. त्त्यामध्ये असाही एक पोस्टर आहे. ज्यामध्ये मंदिर आणि शिक्षणाची तुलना करण्यात आली आहे. या पोस्टरवर एकीकडे लालूप्रसाद यादव आणि राबडी देवी यांचे फोटो आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांचा फोटो आहे. पोस्टरच्या वरच्या भागामध्ये गौतम बुद्ध, सम्राट अशोक, सावित्रीबाई फुले आणि इतर थोर व्यक्तींचे फोटो आहेत.
या पोस्टरवर लिहिलंय की, मंदिराचा अर्थ मानसिक गुलामगिरीचा मार्ग आणि शाळेचा अर्थ जीवनामध्ये प्रकाशाचा मार्ग असा होतो. जेव्हा मंदिरातील घंटा वाजते तेव्हा ती आपण अंधश्रद्धा, थोतांड, मूर्थपणा आणि अज्ञानाच्या दिशेने जात असल्याचा संदेश देते. तर जेव्हा शाळेची घंटा वाजते तेव्हा ती आपण तर्कपूर्ण ज्ञान आणि शास्त्रीय दृष्टीकोनाच्या प्रकाशाच्या दिशेने जात असल्याचा संदेश देते. आता कुठल्या मार्गाने जायचं आहे हे तु्म्हाला निश्चित करायचे आहे. - सावित्रीबाई फुले.
एवढंच नाही तर या पोस्टरवर सनातन आणि हिंदू देवीदेवतांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या फतेहबहादूर सिंह यांचाही फोटो आहे. फतेहबहादून सिंह यांनी माता सरस्वतीबाबत वादग्रस्त विधान केलं होतं. तसेच दुर्गामातेबाबतही वादग्रस्त विधान केलं होतं.