पुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण न झाल्याने 'त्यानी' मुलींचं नाव ठेवलं 'अनचाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 09:03 AM2018-03-26T09:03:22+5:302018-03-26T09:03:22+5:30
मुलगा न झाल्याने त्यांनी दोन मुलींची नाव 'अनचाही' (नको असलेली) असं ठेवलं आहे.
मंदसौर- जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 35 किलोमीटर लांब असणाऱ्या बिल्लौर गावातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेथिल दोन दाम्पत्याला मुलगा न झाल्याने त्यांनी झालेल्या मुलींची नाव 'अनचाही' असं ठेवलं आहे. विशेष म्हणजे मुलगा व्हावा यासाठी नवस, उपवास असं सगळं या दोन्ही दाम्पत्याने केलं. पण तरिही मुलगा न झाल्याने त्यांनी दोन मुलींची नाव 'अनचाही' (नको असलेली) असं ठेवलं आहे. या दोन्ही मुलींची नावं जन्माचा दाखला, आधारकार्ड व शाळेतही तेच ठेवण्यात आलं आहे. मध्य प्रदेशात मुलींच्या जन्मासाठी सकारात्मक दृष्टीकोनाचा प्रसार व्हावा, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. तसंच मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी लाडली लक्ष्मी योजना सारख्या विविध योजना सुरू असतानाही अशा प्रकारच्या घटना समोर येत आहे. या दोन मुलींपैकी एक मुलगी मंदसौर कॉलेजमध्ये बीएससीच्या प्रथम वर्षात शिकते आहे.
बीएससीच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या 'अनचाही'ची आई कांताबाई यांनी सांगितलं की, आम्ही मुलगा व्हावा यासाठी नवसं केला होता. पण तरिही पाचवं अपत्य मुलगीच झाली. पाचवीही मुलगी झाल्याने आमचं मुलगा व्हावा, ही इच्छा पूर्ण झाली नाही. म्हणूनच आम्ही मुलीचं नाव 'अनचाही' ठेवलं. या मुलीनंतर तरी मुलगा होईल असं आम्हाला वाटलं होतं. पण पुन्हा मुलगीच झाली, पण दीड वर्षानंतर तिचा मृत्यू झाला. यानंतर आम्ही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली. याच गावातील आणखी एक परिवार आहे ज्यांचीही पुत्र प्राप्तीची इच्छा पूर्ण झाली नाही. मुलासाठी नवस बोलूनही मुलगा झाला नाही. तीनही मुलींचा जन्म झाला. म्हणून या कुटुंबानेही शेवटच्या मुलीचं नाव अनचाही ठेवलं. ही मुलगी सहावीत शिकते आहे.
बीएससीच्या पहिल्या वर्षात शिकत असणाऱ्या मुलीला तिचं नाव बदलून घ्यायचं आहे. शाळा, कॉलेजमधील तिच्या इतर मित्र-मैत्रिणींना तिच्या नावाचा अर्थ समजल्यावर त्यांनी तिची मस्करी केली. त्यामुळे नाव बदलून घेण्याची तिची इच्छा आहे. दहावी परीक्षेचा फॉर्म भरताना या मुलीने नाव बदलण्याचा प्रयत्न केला. पण शाळा प्रशासनाने नाव बदलता येणार नसल्याचं सांगितलं. पण तरिही पुढे नाव बदलून मिळावं यासाठी ती प्रयत्न करते आहे.