मंदसोर- मध्य प्रदेशमधल्या मंदसोरमध्ये आठ वर्षांच्या चिमुकलीचं अपहरण करून अत्यंत निर्दयीपणे बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बलात्कारातील आरोपींना कठोरातली कठोर शिक्षा देण्याचीही पीडितेच्या कुटुंबीयांनी मागणी केली आहे. तर दुसरीकडे या घटनेवर भाजपा आमदारानं खालच्या पातळीवरच्या राजकारणाचा नमुना समोर ठेवला आहे.शुक्रवारी जेव्हा मंदसोरमध्ये 8 वर्षांच्या मुलीवर अत्यंत घृणास्पदरीत्या बलात्कार झाला. त्या प्रकाराचा रस्त्यावर उतरून जनतेनं निषेध नोंदवला. त्याच दरम्यान भाजपाचे खासदार सुधीर गुप्ता यांच्याबरोबर आमदार सुदर्शन गुप्ताही पीडित चिमुकलीच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी इंदुरच्या एमवाय रुग्णालयात पोहोचले. रुग्णालयात पीडितेचं कुटुंबही उपस्थित होतं. खासदारांनी डॉक्टरांकडे मुलीच्या तब्येतीची चौकशी केल्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्याच वेळी आमदार सुदर्शन पीडितेच्या कुटुंबीयांना म्हणाले, खासदारसाहेबांना धन्यवाद बोला.एकीकडे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहानांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे. बलात्कारी हे भुईला भार असून त्यांना जिवंत राहण्याचा अधिकारच नसल्याचंही ते म्हणाले आहेत. तर दुसरीकडे त्यांच्या पक्षाचे नेते खालच्या पातळीवरचं राजकारण करत असल्यानं राजकीय वर्तुळातून यावर टीकेची झोड उठली आहे. सुदर्शन गुप्ता पीडितेच्या कुटुंबीयांना म्हणाला, मंदसोर खासदारमहोदयांना धन्यवाद करा, कारण ते तुमच्या मुलीला पाहण्यासाठी रुग्णालयात आले आहेत. त्यानंतर पीडितेच्या आई-वडिलांनीही खासदारसाहेबांसमोर हात जोडले.मंदसौर येथे मंगळवारी घरी जाण्यासाठी शाळेच्या बाहेर पालकांची वाट पाहत उभ्या असलेल्या या चिमुकलीचे इरफान उर्फ भैय्यू (20) याने अपहरण करून तो तिला बस स्थानकाजवळील झुडपांच्या मागे घेऊन गेला व तिच्यावर बलात्कार केला. स्थानिक बाजारपेठेत मजूर म्हणून काम करत असलेल्या इरफानला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणाने दिल्लीत 2012साली नर्सिंगच्या एका विद्यार्थिनीवर सहा जणांनी सामुदायिक बलात्कार केला होता, त्याच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.
मंदसोर बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांना भाजपा आमदार म्हणाला, खासदारसाहेबांना धन्यवाद बोला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2018 10:58 AM