केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी बुधवारी उत्तर प्रदेशच्या सुलतानपूर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी प्रत्येक निवडणुकीत स्पर्धा असते, पण मला वाटतं की आम्हीच जिंकू असं म्हटलं आहे. यावेळी मनेका यांनी अमेठी आणि रायबरेलीमधून निवडणूक लढवणाऱ्या गांधी कुटुंबाशी संबंधित प्रश्नालाही उत्तर दिलं आहे.
मनेका गांधी यांना राहुल गांधी अमेठीतून आणि प्रियंका गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवण्यासंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे. "नामांकनासाठी फक्त दोन दिवस उरले आहेत. काँग्रेसचे पत्ते कधी उघडतील हे मला माहीत नाही" असं मनेका गांधी यांनी म्हटलं आहे.
भाजपाने सुलतानपूर मतदारसंघातून मनेका गांधी यांना सलग दुसऱ्यांदा तिकीट दिलं आहे. 2019 मध्येही याच जागेवरून निवडणूक जिंकली होती. मनेका गांधी या 2014 ते 2019 या काळात मोदी सरकारमध्ये मंत्रीही होत्या. यापूर्वी 2014 मध्ये मनेका यांचे पुत्र वरुण गांधी सुलतानपूर मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. 2019 मध्ये भाजपाने वरुण गांधी यांना पीलीभीतमधून तिकीट दिले होते. यावेळी भाजपाने वरुण गांधींच्या जागी जितिन प्रसाद यांना पीलीभीतमधून उमेदवारी दिली आहे.
मनेका 2014 मध्ये पीलीभीतमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. 2004 मध्ये त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी त्यांनी 1984 मध्ये राजीव गांधी यांच्या विरोधात अमेठीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर मनेका यांनी 1988 मध्ये व्हीपी सिंह यांच्या जनता दल पार्टीत प्रवेश केला. मनेका यांनी 1989 मध्ये पहिल्यांदा पीलीभीतमधून निवडणूक जिंकली आणि केंद्रात मंत्री बनल्या.