ऑनलाइन लोकमत
पिलभीत, दि. २५ - भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपा नेते काँग्रेसवर आरोपांच्या फैरी झाडत असतानाच भाजपच्या केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधींनी ' भ्रष्टाचाराला आळा कसा घालायचा हे सोनिया गांधींकडून शिकले पाहिजे' असा सल्ला देत अप्रत्यक्षपणे काँग्रेसाध्यक्षांची स्तुती केली. शनिवारी पिलभीत येथील मनेका गांधी यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
पिलभीत येथे जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीस उपस्थित असलेल्या मनेका गांधी यांच्यासमोर अधिकाऱ्यांनी शिक्षणक्षेत्रातील भ्रष्टाचारी अधिकारी शाळेला मान्यता देण्यासाठी लाच मागत असल्याची तक्रार केली. तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत असमर्थता दर्शवली. लखनऊमधील अनेक शाळांमध्ये परवानगी नसतानाही मोठ्या इयत्तांचे वर्ग चालवले जातात. काही सरकारी बाबू पैसे घेऊन या शाळांना (वर्ग चालवण्याची) परवानगी देतात. मात्र, त्या सरकारी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे हक्क आम्हाला नाहीत, अशी तक्रार एका अधिका-याने मनेका यांच्यासमोर मांडली.
त्यावर बोलताना मनेका यांनी भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी त्या अधिका-याला सोनिया गांधी यांचे अनुकरण करण्याचा सल्ला दिला. सोनिया यांनी आपल्या नावाचा गैरवापर होऊ देणे कसे टाळले, हेही त्यांनी स्पष्ट केले. ' सोनिया गांधी यांच्या एका नातेवाईकाने एक दुकान उघडले आणि आपण सोनियांचे नातेवाईक असल्याचे सांगून त्यांनी आपल्या दुकानाची जाहिरात करण्यास सुरूवात केली. सोनिया गांधी यांना हे समजताच त्यांनी थेट वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून त्या दुकानात जाऊ नका, असे लोकांना सांगितले' असे मनेका यांनी सांगितले. त्याचप्रमाणे तुम्हीही अशी जाहिरात प्रसिद्ध करा आणि ज्यांना (शाळेला) मान्यता हवी असेल त्यांना थेट तुमच्याकडे येण्यास सांगा. तुमच्या ऑफीसबाहेरही अशी नोटीस लावा असा सल्ला मनेका यांनी दिला. त्यानंतर आम्ही त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करू, असेही मनेका यांनी नमूद केले.