नवी दिल्ली - देशाचे लक्ष लागून असलेल्या अमेठी लोकसभा मतदार संघातून भारतीय जनता पक्षाच्या नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी विजयी झाल्या आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी लोकसभा मतदारसंघामध्येही काँग्रेसला इतिहासामध्ये प्रथमच पराभव स्वीकारावा लागला आहे. राहुल गांधी अमेठीतून पराभूत झाल्यानंतर भाजपा नेत्या मनेका गांधी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राजकारण हा काही पोरखेळ नाही, अशा शब्दांत मनेका गांधी यांनी राहुल गांधींना टोला लगावला आहे.
'राजकारण हा काही पोरखेळ नाही. त्यांनी निवडणूक प्रचारात एकही योग्य मुद्दा उचलला नाही. केवळ गाडीत बसून हात उंचावला म्हणजे निवडणूक प्रचार झाला असं होत नाही. राजकारण करायचं तर व्यवस्थित आणि गंभीरपणे करा' असं मनेका गांधी यांनी राहुल गांधी यांना म्हटलं आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मनेका यांनी ही टीका केली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपा आणि एनडीएने दणदणीत विजय मिळवला आहे. तर काँग्रेस आणि यूपीएला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे, दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावी जबाबदारी स्वीकारली असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच स्मृती इराणी यांना विजयासाठी शुभेच्छा देताना, अमेठी लोकसभा मतदारसंघाची काळजी घ्या अशी भावनिक साद घातली. 2004 पासून राहुल गांधी येथून विजय मिळवत आले आहे.
निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा पर्व; राहुल गांधीसह सगळेच नेते रांगेतलोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये सर्वाधिक फटका काँग्रेसला बसला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी स्वत: अमेठी लोकसभा मतदारसंघातून पराभूत झाले आहेत. जर अनेक राज्यांमध्ये काँग्रेसला भोपळा मिळाला आहे. 2014 च्या तुलनेत यंदा मोदीलाट नाही,त्यामुळे विरोधकांना चांगल्या जागा मिळतील अशी अपेक्षा होती. मात्र सगळ्यांचे अंदाज चुकले. पुन्हा एकदा आणखी दमदार पाऊलं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टाकलं आहे. काँग्रेसच्या या पराभवानंतर पक्षातंर्गत मोठी हालचाल समोर येत आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या खराब कामगिरीची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठवला आहे. अमेठी लोकसभा मतदारसंघातील पराभवाची जबाबदारी घेत जिल्हाध्यक्ष योगेश मिश्रा यांनीही राजीनामा दिला आहे. तर ओडिशामध्ये लोकसभा आणि विधानसभा दोन्ही निवडणुकीमध्ये निराशाजनक कामगिरी राहिल्याने प्रदेशाध्यक्ष निरंजन पटनायक यांनीदेखील राजीनामा दिला आहे.