कर्नाटकात ब्लॅक फंगसच्या भीतीमुळे एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघं पती-पत्नी कोरोना संक्रमित होते. सुसाईड नोटमध्ये पतीने म्हटलं की, माझ्या पत्नीला मधुमेहाचा त्रास आहे. अनेक माध्यमात कोरोना(Coronavirus) संक्रमित मधुमेह असणाऱ्या रुग्णांना ब्लॅक फंगस आजाराचा धोका असल्याचं सांगण्यात आलं. ब्लॅक फंगसमुळे आमच्या शरीराला वेदना होतील अशी भीती दोघांच्या मनात होती.
सुसाईड नोटमध्ये यापुढे म्हटलं होतं की, ब्लॅक फंगस आजार झाल्यास आम्हाला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल. ती खर्च करण्याची आमची ऐपत नाही. त्यामुळे आम्ही दोघंही आत्महत्या करत आहोत. ४० वर्षीय रमेश आणि ३५ वर्षीय गुना सुवर्णी असं मृतकांचे नाव आहे. हे दोघंही मंगलोरच्या बँकम्पाद्यो येथे एका अपार्टेमेंटमध्ये राहत होते. रमेशची पत्नी सुवर्णा मधुमेह आजाराची रुग्ण होती. मागील एक आठवड्यापासून दोघांमध्येही कोरोनाची लक्षणं आढळली होती.
सुसाईड करण्यापूर्वी दोघांनीही शहराचे पोलीस आयुक्त एन शशि कुमार यांना ऑडिओ मेसेज पाठवला. या ऑडिओ मेसेजमध्ये त्यांनी ब्लॅक फंगस आजारामुळे आमच्या मनात खूप दहशत आहे. त्यामुळे आम्ही दोघांनी आमचं आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. त्यावर पोलीस आयुक्तांनी तात्काळ दोघांशी संपर्क साधत कुठलंही टोकाचं पाऊल उचलू नका अशी विनवणी केली. आयुक्तांनी माध्यमांद्वारे या दाम्प्त्यांचा शोध घेऊन त्यांचा जीव वाचवण्याचं आवाहन लोकांना केले. परंतु पोलीस यांचा शोध घेतील तोवर दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
तसेच गुना सुवर्णीला काही शारिरीक समस्या असल्याने ती बाळाला जन्म देऊ शकत नव्हती. त्यामुळे लोकांमध्ये राहण्यापासून ती दूर जात होती. लोकं तिला विचारतील म्हणून तिने लोकांपासून अंतर ठेवले. सुसाईड नोटमध्ये पत्नी म्हणते की, मी आणि माझ्या पतीने निश्चिय केलं आहे. आम्हाला शरण पंपवेल आणि सत्यजीत सुरथकल यांच्याकडून हिंदू प्रथा परंपरेने आमच्यावर अंत्यसंस्कार करावे. आम्ही त्यासाठी १ लाख रुपये ठेवले आहेत. मी पोलीस आयुक्त एन शशि कुमार, शरण पंपवेल आणि सत्यजीत सुरथकल यांना आमच्या अंत्यसंस्कारासाठी मदत करण्याचं आवाहन करते असं लिहिलं आहे.
दरम्यान, घरातील सामान गरिबांना वाटून टाका, कारण ते आमच्या आईवडिलांना काहीच उपयोगाचं नाही. आम्ही आमच्या घरमालकांची माफी मागतो असंही सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. आरोग्य मंत्री सुधाकर म्हणाले की, मंगलोर येथे कोविड १९ चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर दाम्पत्याने आत्महत्या केली आहे. ही दुर्दैवी गोष्ट आहे. कर्नाटकात आतापर्यंत २८ लाखाहून अधिक कोविड १९ आजारातून बरे झाले आहेत.