नवी दिल्ली : अदानी समूह एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाकडून मंगळुरू विमानतळ ३१ ऑक्टोबर रोजी, लखनऊ विमानतळ २ नोव्हेंबर तर अहमदाबाद विमानतळ ७ नोव्हेंबरपासून चालविण्यासाठी ताब्यात घेणार आहे.
हे विमानतळ विकसित करून चालविण्यास देण्याकरिता खासगी कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्यामध्ये अदानी समूहाने बाजी मारली होती. मंगळुरू, लखनऊ, अहमदाबाद विमानतळ चालविण्यास देण्याकरिता केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने अदानी अहमदाबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड, अदानी लखनऊ इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड, अदानी मंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड या तीन कंपन्यांशी २१ ऑक्टोबर रोजी सामंजस्य करार केले आहेत.
कस्टम, इमिग्रेशन, आरोग्य, सुरक्षा व्यवस्था आदी गोष्टींबाबतही या सामंजस्य करारांमध्ये उल्लेख करण्यात आले आहेत. त्याचबरोबर दळणवळण, नेव्हिगेशन, हवाई वाहतूक व्यवस्थापन या गोष्टींबाबत एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाने अदानी समूहाच्या या तीन कंपन्यांशी स्वतंत्र करार केले आहेत. हे तीनही विमानतळे अदानी समूहाला विकसित करण्याकरिता व चालविण्यासाठी द्यावे याबाबतचा पहिला करार यंदाच्या वर्षी १४ फेब्रुवारीला झाला होता.
राज्य सरकारांच्या आक्षेपांमुळे झाला विलंबमंगळुरू, लखनऊ, अहमदाबाद हे तीनही विमानतळे अदानी समूहाला चालविण्यासाठी देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने जुलै २०१९मध्येच घेतला होता. त्यानंतर आणखी तीन विमानतळे अदानी समूहाला चालविण्यास देण्याचा निर्णय केंद्र सरकारने गेल्या महिन्यात घेतला. संबंधित राज्य सरकारांनी घेतलेले आक्षेप व न्यायालयात सुरू असलेले खटले यामुळे तीन विमानतळांचे अदानी उद्योग समूहाकडे हस्तांतरण करण्याच्या प्रक्रियेस विलंब झाला. त्यामुळे विमानतळांचे हस्तांतरण अदानी समूहाकडे कधी होते याकडे हवाई वाहतूक उद्योगातील लोकांचे लक्ष लागलेले होते.