लखनौ - कोरोना महामारीच्या संकटात गेल्या 1 वर्षांपेक्षा जास्त काळ फ्रंटलाईन वर्कर्स आपली सेवा देत आहेत. डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सफाई कर्मचारी, पत्रकार यांसह अनेकजण कोरोनाच्या काळात आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या सेवेसाठी तत्परतेनं उतरले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही या लढाईत ते सर्वात पुढे आहेत. मँगो मॅन पद्मश्री हाज कमील उल्लाह खान यांनी या सर्व कोविड योद्ध्यांच्या कार्याला वेगळ्याच पद्धतीने सलाम केलाय.
मँगो मॅन म्हणून प्रसिद्ध असलेल्या कमील उल्लाह खान यांनी आपल्या आंब्याच्या बागेतील आंब्यांना फ्रंटलाईन वर्कर्सची नावे दिली आहेत. कोविडच्या काळात अनेक डॉक्टरांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे, आपल्या नर्सरीत डॉक्टर्स आंबा नावाने आंब्यांची प्रजाती निर्माण केली आहे. तसेच, पोलिसांच्या बाबतीतही आहे, त्यामुळे पोलीस आंबा नावानेही आंब्याची नवीन प्रजाती निर्माण केली आहे. त्यामुळे, कोविड काळात बलिदान देणाऱ्यांचे स्मरण लोकांना होईल आणि या आंब्यांच्या प्रजातीतून ते जिवंत राहतील, असे कलीम उल्लाह खान यांनी म्हटलंय.
कलीम उल्लाह खान यांनी यासोबत देशाचं नाव मोठं करणाऱ्या आणि असामान्य कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या दिग्गजांचीही नावे काही आंब्यांना दिली आहेत. या आंब्यांच्या प्रजातीमध्ये मोदी आंबा हीही नवी प्रजाती त्यांनी विकसीत केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाने देशाला एक मोठी उंची प्राप्त करुन दिलीय. त्यामुळेच, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं महत्त्व वाढलं आहे. मोदींप्रमाणेच योगी आदित्यनाथ हेही तब्बल 18 तास काम करत आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीही या लढ्यात सातत्याने आपलं योगदान देत आहेत. त्यासोबतच, तरुण नेते म्हणून अखिलेश यादव यांनीही चांगल काम केलंय. तर, जगतसुंदरी असलेल्या ऐश्वर्या राय यांच्याही नावाने आपण आंब्याचं वाण बनविल्याचं खान चाचांनी सांगितलं.
२००८ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित
बागायत शेतीचे तज्ज्ञ असणाऱ्या खान हे कलम करण्याच्या तंत्रज्ञानाच्या मदतीतून आठ एकर जमिनीमध्ये १६०० वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्याच्या वाणांचे उत्पादन घेतात. उत्तर प्रदेशमधील महिलाबाद येथे खान कुटुंबाच्या २० एकर जमिनीवर आंब्याच्या बागा आहेत. त्यापैकी ८ एकरावर कलीमुल्लाह हे आंब्याची नवीन नवीन कलम तयार करुन प्रयोग करत असतात. त्यांनी कलम करण्याच्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून म्हणजेच ग्राफ्टींगच्या माध्यमातून एकाच झाडावर ३०० प्रकराच्या आंब्यांचे उत्पादन घेतलं होतं. आंबा संशोधन आणि बागायती शेतीमधील प्रयोगशिलतेसाठी त्यांना २००८ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं.