एनआरसीवरून मोदी-शहांमध्ये मतभेद, मणिशंकर यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2020 10:12 AM2020-01-16T10:12:16+5:302020-01-16T10:32:12+5:30
वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे.
लाहोर - वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. पाकिस्तानमध्ये जाऊन मणिशंकर यांनी एक दावा करत वादग्रस्त विधान केलं आहे. एनपीआर आणि एनआरसी या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात मतभेद असल्याचा दावा मणिशंकर अय्यर यांनी केला आहे.
मणिशंकर अय्यर हे पाकिस्तानातील एका चर्चासत्रात सामील झाले होते. एका पॅनल चर्चेत बोलताना मणिशंकर यांनी हा दावा केला आहे. या चर्चेत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानही सहभागी झाले होते. त्याच दरम्यान त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 'मोदी आणि शहा दोघेही भारतात हिंदुत्वाचा चेहरा आहेत. नरेंद्र मोदी सरकार एनपीआरच्या माध्यमातून एनआरसी आणण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र एनआरसी आणण्याचा निर्णय आधीचा आहे, असं लिखित आश्वासन शहा यांनी संसदेत दिलं आहे' असं अय्यर यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अय्यर यांनी 'या मुद्द्यावरून हिंदुत्वाचा चेहरा असलेल्या या दोन्ही नेत्यांमध्ये फूट असल्याचं मला दिसतं. आम्ही अनेक गोष्टी होताना पाहिल्या आहेत. काही लोकांना या गोष्टी आंतरराष्ट्रीय स्वरुपाच्या नाहीत असं वाटतं, त्यामुळेच मोदी या गोष्टी सुरू ठेवून आहेत' असंही अय्यर यांनी म्हटलं आहे. दिल्लीच्या शाहीन बाग येथे नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन सुरू असताना अय्यर तेथे आले होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. भाजपाने सबका साथ, सबका विकासच्या नावाखाली निवडणुका जिंकल्या. मात्र सबका साथ घेऊन सबका विनाश केला, अशी टीका अय्यर यांनी केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन वर्षांपूर्वी ‘नीच’ असा उल्लेख केल्याने वादात सापडलेले काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी आपले विधान योग्यच होते, असा दावा काही दिवसांपूर्वी एका लेखात केला होता. त्यामुळे भाजपाने पुन्हा त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. मणिशंकर अय्यर यांना वरील विधानामुळे काँग्रेसने निलंबित केले होते. पुढे 2018 मध्ये त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. त्यानंतर अय्यर यांनी मोदी यांचा उल्लेख देशाने पाहिलेला अत्यंत शिवराळ पंतप्रधान असा केला होता.
महत्त्वाच्या बातम्या
उद्धव ठाकरेंच्या शपथविधीवर किती खर्च झाला?; RTIमधून आकडेवारी समोर
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा फोटो असलेल्या वह्या शाळेत वाटल्या, प्राचार्यांचं निलंबन
लोकमान्य टिळक एक्स्प्रेस रुळावरुन घसरली, 40 प्रवासी जखमी
36 केंद्रीय मंत्री जम्मू-काश्मीरचा दौरा करणार, सरकारच्या योजनांची माहिती देणार
'अच्छे दिन' येतील तेव्हा येतील, पण निदान आधीचे 'बरे दिन' तरी आणा; महागाईवरुन शिवसेनेचा टोला