नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन वर्षांपूर्वी ‘नीच’ असा उल्लेख केल्याने वादात सापडलेले कॉँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी आपले विधान योग्यच होते, असा दावा एका लेखात केला आहे. त्यामुळे भाजपने पुन्हा त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मणिशंकर अय्यर यांना वरील विधानामुळे काँग्रेसने निलंबित केले होते. पुढे २0१८ मध्ये त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. त्यानंतर आता अय्यर यांनी मोदी यांचा उल्लेख देशाने पाहिलेला अत्यंत शिवराळ पंतप्रधान असा केला आहे.
अय्यर यांचे तेव्हाचे विधान आम्हाला अमान्य होते. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर कारवाई केली होती. ते त्या विधानाचे समर्थन करीत असले तरी आम्हाला ते मान्य नाही. अशी भाषा व टीका ही आमची संस्कृती नाही, त्यांच्यावर योग्य वेळी कारवाई केली जाईल, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. जनता २३ मे रोजी सत्तेतून बाहेर घालवेल, देशाने पाहिलेल्या शिवराळ पंतप्रधानाची तो अखरेचा दिवस असेल. ते सभ्य नाहीत. मी मोदी यांना ७ डिसेंबर २०१७ मध्ये काय म्हटले होते, आठवते का? मी योग्य भविष्यवाणी केली नव्हती? या पद्धतीचे घाणेरडे राजकारण करण्याची काही आवश्यकता नाही, असे अय्यर यांनी म्हटले आहे. मोदी यांनी जवानांचा बळी दिल्याचाही आरोप अय्यर यांनी केला आहे. राजीव गांधी यांच्याविषयीच्या मोदींच्या विधानामुळे अय्यर यांनी वरील वक्तव्य केले आहे.
...हा तर दुटप्पीपणाभाजपचे नेते जीव्हीएल नरसिंह राव यांनी अय्यर यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, त्यांनी आपले पूर्वीचे विधान योग्य ठरविण्यासाठी खटाटोप केला. त्यांनी माफी मागितली होती. त्यांच्या पक्षानेही त्यांना निलंबित केले. असे वक्तव्य आपले हिंदी वाईट असल्याने उद्गारले गेले, असे म्हटले होते. आता मात्र आपण योग्य भविष्यवाणी केल्याचे ते सांगत आहेत. कॉँग्रेसने त्यांना गेल्याच वर्षी पक्षात घेतले. कॉँग्रेसचा दुटप्पीपणा यातून दिसून येतो.