तिरुअनंतपूरमः काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी केरळमध्ये एका जनसभेला संबोधित करताना भाजपाला देशद्रोही म्हटलं आहे. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याप्रकरणी मणिशंकर अय्यर यांनी भाजपावर हल्लाबोल केला. त्यांनी सरकारनं काश्मीरच्या दौऱ्यावर 36 मंत्र्यांना पाठवण्याच्या निर्णयावर टीका केली. भाजपाचे लोक हे दगाबाज आहेत. ते जनतेचे प्रतिनिधी नाहीत. सरकार काश्मीर खोऱ्यात 36 मंत्री पाठवणार होती. पण त्या 36 पैकी 31 मंत्री जम्मूला, तर फक्त पाच मंत्री काश्मीरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. हे लोक डरपोक आहेत, काश्मीर खोऱ्यातील जनतेच्या उद्रेकाची यांना भीती वाटत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे. जम्मू-काश्मीरपासून लडाखला वेगळं करण्यात आलं आहे. काश्मीर खोऱ्यातील लोकांवर अत्याचार होत आहेत. चार हजार नेत्यांना तुरुंगात बंद करण्यात आलं आहे. देशात असे काही देशद्रोही आहेत, त्यांना आपण पहिल्यांदाच पाहतो आहोत. प्रत्येक समाजात काही विश्वासघातकी लोक असतात, असं म्हणत त्यांनी भाजपावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन वर्षांपूर्वी ‘नीच’ असा उल्लेख केल्याने मणिशंकर अय्यर वादात सापडले होते. मणिशंकर अय्यर यांना वरील विधानामुळे काँग्रेसने निलंबित केले होते. पुढे 2018मध्ये त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले. त्यानंतर आता अय्यर यांनी मोदी यांचा उल्लेख देशाने पाहिलेला अत्यंत शिवराळ पंतप्रधान असा केला आहे.
काश्मीरला जाणारे मंत्री 'डरपोक', मणिशंकर अय्यर यांचा भाजपावर हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 9:31 AM