नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खालच्या पातळीवर टीका करणारे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. तसेच निलंबित करत असताना काँग्रेस पक्षानं त्यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मणिशंकर अय्यर यांनी असंसदीय अशा 'नीच' या शब्दाचा वापर केला होता. त्यामुळे त्यांच्यावर आरजेडीच्या लालूप्रसाद यादवांपासून काँग्रेसच्या नेत्यांची टीकेची झोड उठवली होती. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मणिशंकर अय्यर यांच्या विधानापासून हात झटकत त्यांना खडे बोल सुनावले होते.भाजपासारखी पातळी सोडून टीका करणं ही काँग्रेसची संस्कृती नाही. मणिशंकर यांनी वापरलेल्या असंसदीय भाषेबाबत त्यांना माफी मागायला हवी, असं म्हणत राहुल गांधी यांनी मणिशंकर यांना सुनावले होते. त्यानंतर मणिशंकर अय्यर यांनीही माफी मागितली होती. मणिशंकर यांच्यावर आम्ही कारवाई केली आहे. 'मोदीजी, तुम्ही अशा प्रकारचं धाडस दाखवू शकाल का?', असा सवालही काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे.
मणिशंकर अय्यर यांना काँग्रेसमधून केलं निलंबित, मोदींबद्दलचं वादग्रस्त विधान भोवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2017 10:48 PM