त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) विजयानंतर माणिक साहा यांनी आज सलग दुसऱ्यांदा त्रिपुराच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. साहा यांच्या नवीन मंत्रिमंडळात भाजप आणि आयपीएफटीच्या आठ आमदारांनी शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डाही उपस्थित होते. दरम्यान, माणिक साहाची कारकीर्द खूपच रंजक राहिली आहे. ते व्यवसायाने डेंटिस्ट होते. यानंतर त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले आणि सर्वात श्रीमंत आमदार ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास केला. चला जाणून घेऊया माणिक साहा यांच्याबद्दल...
डेंटिस्ट ते राजकारणी70 वर्षीय माणिक साहा हे डेंटिस्ट ते राजकारणी बनले आहेत. 2016 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल कॉलेजमधून बीडीएसचे शिक्षण घेतलेल्या माणिक साहा यांना भाजपने गेल्या वर्षीच त्रिपुराचे मुख्यमंत्री बनवले होते. माणिक साहा हे एक खेळाडू होते. तसेच, ते त्रिपुरा क्रिकेट असोसिएशनचे प्रमुख होते. याशिवाय, माणिक साहा हे 2020 ते 2022 दरम्यान त्रिपुरामध्ये भाजपचे प्रमुखही राहिले आहेत. मुख्यमंत्री होण्यापूर्वी ते राज्यसभेवर निवडून गेले होते.
भाजपमध्ये प्रवेश करण्याआधी काँग्रेसमध्ये होते माणिक साहा भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी माणिक साहा काँग्रेसमध्ये होते. 2016 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना बूथ व्यवस्थापन समिती आणि राज्यस्तरीय सदस्यत्व मोहिमेच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली. माणिक साहा हे मुख्यमंत्री होण्याच्या एक महिना आधी राज्यसभेचे खासदार म्हणून निवडून आले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी राज्यसभेचे सदस्यत्व सोडले.
त्रिपुराचे सर्वात श्रीमंत आमदारत्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा हे राज्यातील सर्वात श्रीमंत आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम त्रिपुराच्या टाउन बारदोवली विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली. माणिक साहा यांनी यावेळी 1257 मतांनी विजय मिळवला आहे. त्यांना 19586 मते मिळाली तर त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे आशिष कुमार साहा यांना 18329 मते मिळाली. तसेच, माणिक साहा यांच्याकडे एकूण 13.90 कोटी रुपयांची संपत्ती आहे. यामध्ये 1.10 कोटी रुपयांच्या जंगम मालमत्ता आणि 12.80 कोटी रुपयांच्या स्थावर मालमत्तेचा समावेश आहे.