मुंबई- मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी त्रिपुरामध्ये गेली २५ वर्षे सत्तेत आहे. त्यातील २० वर्षे मुख्यमंत्रीपदी माणिक सरकार आहेत. माणिक सरकार यांनी १९९८ साली मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. १९९३ ते १९९८ या पाच वर्षांसाठी दशरथ देव मुख्यमंत्री होते. देव यांच्याकडून माणिक सरकार यांनी सूत्रे स्वीकारली. भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्री म्हणून त्यांना ओळखले जाते. आताही मतमोजणीच्या पहिल्या फेरीमध्ये माणिक सरकार त्यांच्या मतदारसंघात आघाडीवर असल्याचे स्पष्ट होत आहे. त्रिपुरासाठी भाजपाने शर्थीचे प्रयत्न केले असले तरी माणिक सरकार यांचे आव्हानही तितकेच तगडे आहे.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माणिक सरकार यांना महिन्याला केवळ 5 हजार रुपये पक्षाकडून मिळतात. माणिक सरकार यांनी निवडणुकीसाठी अर्ज भरताना आपल्याकडे सध्या 1,520 रुपये असून राष्ट्रीयकृत बँकेत 2,410 रूपये आहेत तसेच इतर कोणत्याही बँकेत आपले खाते नाही असे जाहीर केले आहे. नगरसेवक आमदारांची संपत्ती पाहिल्यावर आजकाल कोट्यवधींचे आकडे समोर येतात. अशा स्थितीत एका मुख्यमंत्र्याची इतकी साधी राहणी नक्कीच विचार करायला लावणारी आहे.
सरकार यांच्याकडे कोणतीही लागवडयोग्य जमिन किंवा घर नसल्याचे त्यांनी नामांकनपत्र भरताना लिहिले आहे, तसेच ते सध्या मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानात राहात आहेत. माणिक सरकार यांची पत्नी पांचाली भट्टाचार्य या निवृत्त सरकारी कर्मचारी आहेत. त्यांच्याकडे रोख 20,140 रुपये असून तसेच त्यांचे दोन बँक खात्यांमध्ये 1 लाख 24 हजार 101 आणि 86 हजार 473.78 रुपये असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. तसेच 2 लाख, 5 लाख आणि 2.25 लाख अशा त्यांच्या तीन कायम ठेवी आहेत व 20 ग्रॅम सोन्याचे दागिने त्यांच्याकडे आहेत.
पांचाली भट्टाचार्य यांच्याकडे 888.25 स्क्वे .फूट मालकीचा भूखंड असून त्यावर बांधकाम करण्यासाठी त्यांनी आजवर 15 लाख रुपये खर्च केले आहेत. त्या एकूण मालमत्तेची किंमत 21 लाख आहे. पांचाली यांनी शेवटचा कर परतावा 2011-12 साली भरला होता. तेव्हा त्यांनी आपले वार्षिक उत्पन्न 4 लाख 49 हतार 770 इतके जाहीर केले होते, त्यानंतर त्यांनी आयकर परतावा भरलेला नाही.