‘खेळाडूंना नाहक त्रास नकाे, मनिका बत्राला उच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2021 05:33 AM2021-11-16T05:33:15+5:302021-11-16T05:33:49+5:30
मनिका बत्राला उच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’
नवी दिल्ली : कोणत्याही खेळाडूला नाहक त्रास देणे थांबवा, असे निर्देश देत दिल्ली उच्च न्यायालयाने ऑलिम्पियन मनिका बत्रा हिला क्लीन चिट देण्याचे भारतीय टेबल टेनिस महासंघाला (टीटीएफआय) सोमवारी निर्देश दिले. मनिकाने टीटीएफआयविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. मनिकाने खासगी प्रशिक्षकाची मागणी करत कुठलीही चूक केलेली नाही. महासंघ नियमबाह्य पद्धतीने निवड करत असून, खेळाडूंना ‘टार्गेट’ केले जात आहे, असेही मनिकाने तक्रारीत म्हटले होते. सीलबंद लिफाफ्यात मिळालेल्या अहवालानुसार हे निष्पन्न होत असून, याची सखोल चौकशी करण्याचे आदेशही न्या. रेखा पल्ली यांनी केंद्रीय क्रीडा मंत्रालयाला दिले.
ऑलिम्पिक पात्रता सामना गमावण्यासाठी एका प्रशिक्षणार्थीकडून माझ्यावर राष्ट्रीय कोच सौम्यदीप रॉय यांनी दडपण आणले होते, असा खुलासा मनिकाने केला. यावर न्यायालयाने टीटीएफआयच्या वकिलांची कानउघडणी केली. ‘महासंघाच्या कामकाजावर आम्ही नाखूष आहोत. कारण नसताना तुम्ही खेळाडूंच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावता. कारणे दाखवा नोटीस मागे घेणार आहात की नाही? चौकशी अहवाल पाहिल्यानंतर खेळाडूंना स्वत:च्या खेळावर लक्ष केंद्रीत करता यावे, यासाठी त्यांना त्रास देणे बंद करा. मनिकाने खासगी प्रशिक्षकाची मागणी करत कुठलीही चूक केलेली नाही, असे तपास अहवालात स्पष्ट म्हटले आहे. मनिकाला दोष देण्यात अर्थ नाही. तिला क्लीन चिट देण्यात यावी’, असे न्या. पल्ली यांनी आदेशात म्हटले आहे.