इम्फाळ : गोव्यापाठोपाठ मणिपूरमध्ये भाजपने सरकार स्थापन करण्याच्या घडामोडीत बाजी मारली असून, विधानसभा निवडणुकीत २८ जागांसह सर्वांत मोठा पक्ष बनलेल्या काँग्रेसला मागे टाकत भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. भाजप विधिमंडळ नेतेपदी एन. वीरेनसिंह यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांची भेट घेवून सरकार स्थापनेचा दावा केला आहे. प्रादेशिक पक्ष आणि एक अपक्ष असे बहुमताचं गणित जमवत भाजपने ३१ ची मॅजिक फिगर पार केली असून, तब्बल ३२ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्रच त्यांनी राज्यपालांना सादर केले आहे. पक्षनिरीक्षक केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोएल यांनी सांगितले की एन विरेन यांना सर्वसंमतीने भारतीय जनता पार्टीच्या विधीमंडळ नेता म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. तेच पक्षाचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील. दरम्यान, विद्यमान मुख्यमंत्री इबोबी सिंग उद्या राजीनाम देणार आहेत.मावळत्या विधानसभेत एकही आमदार नसलेल्या भाजपने मणिपूरमध्ये ऐतिहासिक यश मिळवत तब्बल २१ जागा जिंकल्या आहेत. प्रत्येकी चार जागा जिंकणाऱ्या नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) व नॅशनल पीपल्स पार्टीने (एनपीपी) भाजपला पाठिंबा दिला आहे. या आठजणांच्या पाठिंब्यामुळे त्यांचा आकडा २९ वर पोहोचतो. केंद्रात सत्तेत सहभागी असलेला रामविलास पासवान यांचा लोकजनशक्ती पक्षाचा एक आमदार निवडून आला असून त्याने भाजपलाच पाठिंबा दिला आहे. तसेच तृणमूल काँग्रेस व एका अपक्षानेही भाजपच्या सरकारमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे भाजपचे संख्याबळ ३२वर पोहोचले आहे. बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठताच भाजपने वेळ न दवडता राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला आहे.मावळते मुख्यमंत्री इबोबी सिंग यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापण्याची तयारी दाखविली आहे. काँग्रेस हा सर्वांत मोठा पक्ष असून सरकार स्थापनेसाठी आम्हालाच आधी निमंत्रण मिळाले पाहिजे, असे इबोबी सिंग यांचे म्हणणे आहे. मात्र, भाजपने ३२ जणांची यादीच दिल्याने काँग्रेसची गोची झाली आहे. राज्यपाल आता नेमकी कोणाला संधी देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
मणिपूरमध्येही भाजपचा सरकार स्थापनेचा दावा
By admin | Published: March 14, 2017 12:30 AM