BJP Congress, Manipur Assembly elections Result 2022: मणिपूरसह पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल गुरूवारी सकाळपासूनच हाती आले. त्यात भाजपा बहुमताच्या आकड्याजवळ असल्याचं दिसलं. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह (N Biren Singh) हे १८ हजार २७१ मतांनी विजयी झाले. हैंगँग (Heingang) मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. त्यांच्या नेतृत्वाखाली मणिपूरमध्ये भाजपाने विजय मिळवलाच. पण विशेष बाब म्हणजे, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन राज्यात विजयी झालेल्या भाजपाच्या जागा काही प्रमाणात कमी झाल्या, पण मणिपूरमध्ये मात्र त्यांच्या जागा वाढल्याचं दिसून आलं.
भाजपाला टक्कर देण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसची मणिपूरमध्ये धूळधाण उडाली. २०१७ साली २८ जागांवर विजय मिळवत काँग्रेस पहिल्या क्रमांकाचा पक्ष होता. पण त्यांच्यातील व इतर पक्षांतील काही आमदारांना फोडून भाजपात घेतल्यानंतर भाजपाने २९ जागांसह सत्तास्थापना केली होती. त्यामुळे निवडणुकांची घोषणा झाली त्यावेळी काँग्रेस १५ जागांसह विरोधी पक्षात होता. पण यावेळी दुपारी चार वाजेपर्यंतच्या आकडेवारीत काँग्रेसला केवळ ४ जागांवर आघाडी घेणं शक्य झालं. याऊलट गेल्या निवडणुकीत स्वबळावर २१ जागा निवडून आणणारा भाजपा या निवडणुकीत बहुमताच्या नजीक पोहोचलं. चार वाजेपर्यंतच्या आकडेवारीत भाजपाला ३० जागांवर आघाडी मिळवण्यात यश आले होते.
चार वाजेपर्यंतच्या कलांमध्ये भाजपचे ३१ तर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे ४ उमेदवार आघाडीवर किंवा विजयी झाले. अन्य स्थानिक पक्षांमध्ये नॅशनल पीपल्स पार्टीचे ९, नागा पीपल्स फ्रंटचे ५ तर एक अपक्षचा ११ आमदार आघाडीवर किंवा विजयी झाले.
निवडणूक जाहीर झाली तेव्हा काय होती मणिपूरमधील परिस्थिती- निवडणूक जाहीर झाली तेव्हा मणिपूरमध्ये एनडीएप्रणित भाजपचे सरकार होते. सरकारमध्ये भाजपचे २९, नागा पीपल्स फ्रंटचे ४, नॅशनल पीपल्स पार्टीचे ३ तर एक अपक्षचा एक आमदार होता. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसकडे १५ जागा होत्या आणि ७ जागा रिक्त होत्या.