इम्फाळ : भाजपाच्या नेतृत्वाखालील मणिपूरमध्ये पहिल्यांदाच स्थापन झालेल्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून एन. बीरेन सिंह यांचा बुधवारी शपथविधी पार पडला. राजभवनात आयोजित शपथविधी समारंभात राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी शपथ दिली. मुख्यमंत्री बीरेन सिंह यांच्यासोबत भाजपा आणि आघाडीच्या ८ सदस्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) आमदार वाय. जॉयकुमार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आले आहे. शपथविधी समारंभाला भाजपाचे सरचिटणीस राम माधव, आसामचे मंत्री हिमंत बिस्वा सरमासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. मावळते मुख्यमंत्री ईबोबी हेही उपस्थित होते. बीरेन सिंह यांची कालच सर्वसंमतीने भाजपा विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली होती. ६० सदस्यीय मणिपूर विधानसभेतील ३२ सदस्यांच्या पाठिंब्यावर भाजपाने सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता.विमानात बिघाड झाल्याने भाजपा अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री एम. व्यंकय्या नायडू यांना शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहता आले नाही. हे दोन्ही नेते ज्या विमानातून प्रवास करीत त्या विमानाच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने विमान माघारी दिल्लीकडे न्यावे लागले. (वृत्तसंस्था)
मणिपूरच्या मुख्यमंत्रिपदी बीरेन सिंह
By admin | Published: March 16, 2017 12:39 AM