ऑनलाइन लोकमत
इंफाळ, दि. 24 - मणिपूरचे मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग सोमवारी सकाळी झालेल्या गोळीबारात बालंबाल बचावले. राज्यातील उखरूल येथे अज्ञात इसमाने सिंग त्यांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले मणिपूर रायफल्सचे दोन जवान जखमी झाले आहेत. एनएससीएन (आयएम)च्या कार्यकर्त्यांनी हा गोळीबार केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
उखरूल येथील रुग्णालय आणि इतर इमारतींचे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंग आणि उपमुख्यमंत्री गैखांगम हे सकाळी 9.30 वाजता इंफाळहून रवाना झाले. त्यांचे हेलिकॉप्टर उखरुल जिल्ह्याच्या मुख्यालयाबाहेर उतरल्यावर त्यांच्याविरोधात स्थानिकांनी आंदोलनास सुरुवात केली. त्याचदरम्यान अज्ञात व्यक्तीने या हेलिकॉप्टरच्या दिशेने गोळीबार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, सुरक्षा दलांना नागा बहूल शहर असलेल्या तांगखूल येथे शोधमोहीम हाती घेतली आहे. तसेच उखरूलमध्ये संतप्त जमावाकडून पोलिसांच्या दोन वाहनांना आग लावण्यात आली आहे.