इम्फाळ - मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील वाहनताफ्यावर कांगपोकपी जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांनी साेमवारी सकाळी केलेल्या हल्ल्यात एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाला. वाहनांचा ताफा जिरिबाम जिल्ह्यातील हिंसाचारग्रस्त भागाकडे रवाना होत असताना, कोटलेन या गावानजीक ही घटना घडली. या ताफ्याबरोबर मुख्यमंत्री नव्हते, असेही सूत्रांनी सांगितले.दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील सैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिले. वाहन ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी सुरक्षा दलांनी मोहीम हाती घेतली आहे. यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह हे दिल्ली दौऱ्यावरून अद्याप परतले नाहीत. ते जिरिबामला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेणार होते. गेल्या शनिवारी जिरिबाम येथे दहशतवाद्यांनी दोन पोलिस चौक्या, वनखात्याचे एक कार्यालय, तसेच ७० घरांना आग लावली. त्यामुळे त्या जिल्ह्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. (वृत्तसंस्था)
हिंसाचारग्रस्तांचा आसाममध्ये आश्रयजिरिबाम येथील हिंसाचारामुळे विस्थापित व्हावे लागलेल्या लोकांनी आसाममधील कचर जिल्ह्यात सुरक्षित स्थळी आश्रय घेतला आहे. आसाम व मणिपूर या दोन राज्यांतील सीमेवरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.