"आम्हाला जे विषारी फळ खावे लागत आहे, त्याचे बीज काँग्रेसने पेरले होते", मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2023 10:42 AM2023-07-02T10:42:18+5:302023-07-02T10:50:22+5:30
आम्हाला जे विषारी फळ खावे लागत आहे, त्याचे बीज विरोधी पक्षानेच पेरले होते, असे म्हणत एन बिरेन सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.
इंफाळ : मणिपुरमध्ये गेल्या काही दिवसापासून हिंसाचार सुरू आहे. दरम्यान, राज्यातील जातीय हिंसाचाराच्या कारणांबद्दल आपण सुद्धा संभ्रमात आहोत. आमच्या सरकारने मेतेई समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा की नाही, याबाबत कोणतीही शिफारस केलेली नाही. याचे उत्तर एकता रॅली काढणाऱ्यांकडे आहे. यानंतरच राज्यात हिंसाचार उसळला, असे मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी शनिवारी सांगितले.
याचबरोबर, आम्हाला जे विषारी फळ खावे लागत आहे, त्याचे बीज विरोधी पक्षानेच पेरले होते, असे म्हणत एन बिरेन सिंह यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, "उच्च न्यायालयाने आम्हाला सांगितले होते.. माझ्या सरकारने अद्याप मेतेई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याची शिफारस केलेली नाही. त्यासाठी चार आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. त्यामुळे हिंसा का होत आहे, हे मला कळत नाही. मेतेई समाजाला एसटीचा दर्जा देण्याच्या विरोधात ज्या संघटनांनी एकता रॅली काढली, त्यांनी जगाला सांगायला हवे. त्याच्याकडे उत्तर आहे."
मणिपूरमधील परिस्थिती 7-10 दिवसांत सुधारेल - हिमंता बिस्वा सरमा
वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, शेजारच्या मणिपूरमधील परिस्थिती 7-10 दिवसांत सुधारेल, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी शनिवारी सांगितले. तसेच, राज्य आणि केंद्र सरकार शांतता प्रस्थापित करण्यासाठी 'शांतपणे' काम करत आहेत. पूर्वीपेक्षा परिस्थिती शांत असताना काँग्रेस आपली चिंता व्यक्त करत आहे, असेही आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले.