नवी दिल्ली : काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूरमध्ये परवानगी मिळालेली नाही. एन विरेन सिंग यांच्या सरकारने इम्फाळमधील पॅलेस मैदानावर यात्रेला परवानगी नाकारली आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी आता ही यात्रा कुठून सुरू करणार? याबाबत सध्या चर्चा सुरु आहे. काँग्रेसने मणिपूर सरकारच्या या निर्णयाला दुर्दैवी म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा येत्या 14 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
मणिपूर सरकारने परवानगी दिली नसल्यामुळे काँग्रेसचे नेते केसी वेणुगोपाल म्हणाले की, मणिपूर सरकारचा हा निर्णय दुर्दैवी आहे. मणिपूर काँग्रेस अध्यक्षांनी आठवड्यापूर्वी मुख्य सचिवांना परवानगीसाठी पत्र दिले होते. 5 दिवसांत निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले होते. 3 दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष के मेघनाचंद्र हे मुख्य सचिवांना भेटायला गेले होते. पण आज आम्हाला माहिती मिळाली की पॅलेस ग्राउंड इंफाळ येथे परवानगी रद्द करण्यात आली आहे.
याचबरोबर, केसी वेणुगोपाल म्हणाले की, आज म्हणजेच बुधवारी सकाळी आमचे माजी मुख्यमंत्री विद्यमान मुख्यमंत्री एन बीरेन सिंग यांना भेटायला गेले आणि त्यांना विनंती केली, पण त्यांनी नकार दिला. मी मणिपूर, आसाम आणि नागालँडला भेट दिली आहे. त्यामुळे मी सांगू शकतो की तेथे यात्रेची लाट आहे. ही राजकीय यात्रा नाही. यात्रा यशस्वीतेसाठी लोक उभे राहिले आहेत, ती नक्कीच यशस्वी होईल. आम्ही फक्त मणिपूरपासून सुरुवात करू, आम्ही दुसरे ठिकाण सांगितले आहे. तेथील मुख्यमंत्र्यांनी आमचे माजी मुख्यमंत्री इबोबी सिंग यांना तोंडी संमती दिली आहे, असे केसी वेणुगोपाल यांनी सांगितले.
6200 किलोमीटरची यात्राराहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मणिपूर ते मुंबई अशी असणार आहे. राहुल गांधी 67 दिवसांत 14 राज्यांतील 85 जिल्ह्यांतून 6200 किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. ही यात्रा मणिपूर, नागालँड, आसाम, मेघालय, बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात मार्गे महाराष्ट्रात पोहोणार आहे.