अनेक महिन्यांपासून जातीय हिंसाचाराच्या आगीत धगधगत असलेल्या ईशान्येकडील राज्य मणिपूरमधील परिस्थिती आता सामान्य होताना दिसत आहे. येथील लोकांची दिनचर्या हळूहळू रुळावर येत आहे. अशा परिस्थितीत मणिपूरमधील सरकारी निर्बंधही शिथिल केले जात आहेत. दरम्यान, मणिपूर राज्य सरकारने शनिवारी मोठा निर्णय घेतला असून अनेक महिन्यांपासून ठप्प असलेली इंटरनेट सेवा पूर्ववत करण्याची घोषणा केली आहे.
मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली आहे. विशेष म्हणजे, मे महिन्यात मणिपूरमध्ये हिंसाचार उसळल्यानंतर राज्य सरकारने इंटरनेट सेवांवर बंदी घातली होती.दरम्यान, मणिपूरमध्ये बहुसंख्य मैतेई आणि अल्पसंख्याक कुकी जमातींमध्ये जातीय हिंसाचार झाला होता. यावेळी सरकारी यंत्रणा पूर्णपणे असहाय दिसून आली होती. याठिकाणी महिलांची नग्नावस्थेत धींड काढल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देश हादरला होता. जवळपास चार महिने दोन्ही समाजामध्ये जोरदार संघर्ष सुरू होता. यावेळी मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. तसेच, घरांची मोठ्याप्रमाणात जाळपोळ झाली होती.
याचबरोबर, हिंसाचारादरम्यान सरकारी वाहने, कार्यालये जाळण्यात आली होती. तसेच पोलीस ठाण्यांना लक्ष्य करण्यात आले. या हिंसाचारात अनेक लोकांचा मृत्यू झाला होता आणि शेकडो जखमी झाले. विशेष म्हणजे मणिपूरमध्ये केंद्रीय सुरक्षा दल तैनात असूनही मोठ्या प्रमाणावर हिंसाचार झाला. दरम्यान, आता केंद्र सरकार, राज्य सरकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांसह राज्यातील प्रज्ञावंतांच्या प्रयत्नांना यश येताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्यातील इंटरनेट सेवा पूर्ववत होणे हा जनतेसाठी मोठ्या दिलासापेक्षा कमी नाही.